ऑनलाईन लोकमत
जळगाव ,दि.7 - मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांसाठी वितरित करण्यात आलेल्या 25 कोटींच्या निधीचा वापर कर्जफेडीसाठी केला जाऊ नये. या निधीबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे दिले.
महापालिकेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली होती. बैठकीस महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित होते.
नाहरकतपत्र मिळाल्यानंतर उड्डाणपुलांच्या निविदा प्रक्रिया
शहरातील शिवाजीनगर, भोईटेनगर रेल्वे गेट, दूध फेडरेशन व असोदा रेल्वे गेटबाबत मनपास रेल्वे प्रशासनाने गुरुवार, 6 रोजी एक पत्र दिले आहे. या पुलांची उभारणी रेल्वे प्रशासन व राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यासाठी 110 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात रेल्वेचा वाटा 55 टक्के, तर राज्य शासनाचा 45 टक्के असेल. यासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र राज्य शासनाने दिल्यास रेल्वे प्रशासनास या पुलांच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात करता येणार आहे. महापौर नितीन लढ्ढा यांनी हे पत्र पालकमंत्र्यांना दाखविले. याप्रश्नी आपण लक्ष घालू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
हुडको कर्ज व उर्वरित विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी करण्यास आपण पाठपुरावा करू, असेही पालकमंत्र्यांनी मनपा पदाधिका:यांना सांगितले. या वेळी माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे, अतुलसिंह हाडा उपस्थित होते.