लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. अनेक नागरिकांना कोरोनासदृश आजाराचे लक्षण जाणवूनदेखील अनेक जण भीतीपोटी कोरोना टेस्ट करायला घाबरत असतात, अनेक वेळा अंगावर काढल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढून रुग्ण दगावण्याची शक्यतादेखील निर्माण होते. अशा परिस्थितीत नागरिक घरच्या घरी राहूनदेखील आपली ऑक्सिजन लेव्हल तपासून घरच्या घरी टेस्ट करू शकतात.
दररोज सहा मिनिटे वॉक करून घरच्या घरी राहून नियमित शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासल्यास आपल्या मनातील भीतीदेखील दूर करता येऊ शकते, तसेच आपल्याला कोरोना आहे की नाही, याबाबतदेखील प्राथमिक स्तरावर माहिती मिळू शकते. कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांमध्ये लक्षणे जाणवू लागतात अशा परिस्थितीत, जर टेस्ट करण्यात आली नसेल तर घरच्या घरी राहूनदेखील ऑक्सिमीटरच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सिजन लेव्हल तपासून, काही अंशी आपण स्वत:ची तपासणीदेखील करू शकता, तसेच गृहविलगीकरणामध्ये असलेल्या अनेक रुग्णांनादेखील ऑक्सिमीटरच्या सहाय्याने नियमित ऑक्सिजन लेवलची तपासणी केली तर होणाऱ्या मोठ्या अडचणींवर मात करता येवू शकते.
अशी करा चाचणी
आपल्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला लावून तसेच धरून ठेवावे, घरातल्या घरात घड्याळ लावून नंतर सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा, नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद करावी.
असे लागणार साहित्य
घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर
तर घ्या काळजी
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाली तर चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर... चालल्यानंतर धाप येणे, दम लागल्यासारखे होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
कोणी करायची ही टेस्ट?
सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर... गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी.
कोट..
सहा मिनिटे वॉक केल्यानंतर पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केल्यावर शरीरातील रक्ताचा पातळीमधील ऑक्सिजनचे प्रमाण पाच ते सहा टक्क्यांनी कमी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. ही चाचणी घरच्या घरी करून काही अंशी फायदा होऊ शकतो; मात्र या चाचणीवर नेहमी अवलंबून राहता येऊ शकत नाही. रुग्णाला इतर व्याधी असतील तर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला तत्काळ घेण्याची गरज आहे.
-डॉ. राधेश्याम चौधरी, सचिव, आय. एम. ए.