जळगाव : ‘मागच्या पालकमंत्र्यांची वनसाईड सत्ता होती. त्यांनी विकासकामांसाठी निधी दिला असता, तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता’, अशी बोचरी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता केली. ते रविवारी, वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी चिंचोलीमध्ये बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, इतर पक्षातील लोकांना त्रास देणे, त्यांना जेलमध्ये पाठवणे, त्यांची चौकशी लावणे यापेक्षा विकासकामांवर भर देणे चांगले. लोकप्रतिनिधींनी जनतेची कामे केली पाहिजेत, अन्यथा माजी मंत्री झाल्यावर बॅग पकडायलाही माणूस नसतो, असा चिमटाही पालकमंत्र्यांनी काढला.
अधिकारी, शेतकरी, व्यापारी यांना सोबत घेण्यासह विकासकामांशी बांधिलकी जपली पाहिजे. व्यापाऱ्यांशी पंगा घेऊ नका. एक पुडी बांधणारा १०० मते फिरवू शकतो हे लक्षात राहू द्या. भाजपा, काँग्रेस, एनसीपी यापैकी कोणत्याही पक्षाच्या आमदाराने आपल्याकडे यावे आणि पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करवून घ्यावी. विकासकामांमध्ये कशाला राजकारण हवे ? इच्छाशक्ती आणि दानत ठेवा, असेही पालकमंत्री म्हणाले. चिंचोलीत नवीन दवाखाना बांधण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर केले असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मंजूर केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऑनलाईन संवादात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. महावितरण जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ४१ लाख रुपये खर्च होणार असल्याची माहिती दिली. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता रमेश पवार यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, रावसाहेब पाटील, कृउबा सभापती कैलास चौधरी, पंचायत समिती सभापती जनाप्पा पाटील, सरपंच राजू पाटील, शरद घुगे, संभाजी पवार, नितीन सपकाळे, मनोज धनगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.