(डमी १२०८)
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बदलत्या जीवनपद्धतीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, त्यात आता भर पडली आहे. बदलत्या खाणपानाची, अनेकजण विशेषकरून लहान मुलं चव पाहून रस्त्यावर मिळणाऱ्या चायनिज पदार्थांकडे आकर्षित होत आहेत. जिभेचे लाड पुरविण्यासाठी लहान मुलांपासून महाविद्यालयीन युवकदेखील चायनिज पदार्थांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, या पदार्थांमधील चव वाढविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अजिनोमोटोसह इतर पदार्थांमध्ये चायनिज पदार्थ विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.
चायनिज पदार्थांत अजिनोमोटो अर्थात मोनो सोडियम ग्लूटामिटचा वापर केला जातो. यामुळे पोटाचे विकार वाढत आहेत. यासह लहान मुलांमध्ये लठ्ठपणा, युवकांमध्ये अल्सरसारखे आजार वाढत जात आहेत. पौष्टिक पदार्थ सोडून आता युवकांचा कल रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांकडे जास्त आहे. जळगाव शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यालगत असो वा कॉलनी, नगरच्या कॉर्नरवर चायनीज पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या असतात. चायनिज पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास या पदार्थांमुळे अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटोला मोनो सोडियम ग्लूटामिट (एमएसजी) असे म्हणतात. तज्ज्ञानुसार ग्लूटामिट सिडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरीत्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे. याचा वापर पूर्वी इतर देशात व्हायचा. पण आता भारतातसुद्धा चायनिज पदार्थ व इतर पदार्थांमध्येसुद्धा याचा वापर केला जातो. चायनीज पदार्थ किंवा हॉटेलमध्ये भाजीला चव येण्याकरिता नॉनव्हेज पदार्थ, अंडाकरी तसेच इतर भाज्यांमध्येसुद्धा अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो.
म्हणून चायनिज खाणे टाळा..
नागरिकांना नकळत जेवणातून घातक आजार मोफत मिळत आहेत. अतिप्रमाणात सतत सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कितीतरी पटीने वाढतो तसेच आतड्याचे, पोटाचे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह लहान मुलांमध्ये लठ्ठपणा, अल्सरसारखे आजारदेखील वाढत आहेत.
कोट..
चायनिज पदार्थच नाही तर हॉटेल व रस्त्यावर विक्री होणारे पदार्थदेखील खाणे बंद केले पाहिजे. हॉटेलमधील जेवण चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर होत असल्याने त्याचे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. कोरोनाच्या काळात नागरिक आरोग्याची काळजी घेत असताना, अशा प्रकारे उघड्यावरील पदार्थ खावून आजारांना निमंत्रण देणे चुकीचे आहे.
- डॉ. उत्तम चौधरी, फिजिशियन