जळगाव : मनपा निवडणुकीत तुम्ही मत देताना आमच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यामुळे खड्डे असो की आणखी काही, याविषयी तुम्ही बोलूच नका...अशा शब्दात सत्ताधारी एका नगरसेवकाने वॉर्डातील खड्डयांची तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकाला सुनावल्याचा प्रकार बुधवारी घडला.शहरात सर्वत्र रस्त्यांची वाट लागलेली असताना या नगरसेवकाने चक्क सुविधा पुरविण्यास नकार दिला. याबाबतीत काही नागरिकांनी ‘लोकमत’कडे याबाबतची माहिती दिली आहे. अमृत योजनेमुळे रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. तसेच ज्या भागात अमृतचे काम झाले नाही अशा भागात रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यातच पावसामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचले आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल पसरल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मुख्य शहरापेक्षा उपनगरांमध्ये जास्त भयानकस्थिती असून, मनपाकडून उपाययोजना करण्यात आल्या तरीही त्याचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही.नागरिकांकडून रस्ते दुरुस्तीसाठी जर नगरसेवकांकडून अपेक्षेने जात असतील व नगरसेवकांकडून जर नागरिकांना अशा प्रकारे उत्तर दिले जात असेल तर सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलेला दिसून येत आहे. नागरिकांनी जर नरसेवकांकडे तक्रार नाही करायची तर कोणाकडे करायची ? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ‘लोकमत’ ला माहिती देणाºया नागरिकांनी आपले नाव न छापण्याचा अटीवर ही माहिती दिली आहे.दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची पुन्हा चाळणी‘लोकमत’ ने खड्डे प्रश्नांवर अभियान राबविल्यानंतर मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य भागात डांबर व खडीव्दारे रस्त्यांची दुरुस्ती केली. तर उपनगरांमधील रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे दुरुस्त करण्यात आले होते. मात्र, दुरुस्त केलेल्या रस्त्यांची शहरात सुरु असलेल्या संततधारमुळे पुन्हा चाळणी झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील खडी उखडून पडली आहे, तर अनेक ठिकाणी मुरूम देखील वाहून गेला आहे. पुन्हा खड्डयांचा त्रास वाढला असून, आता नागरिकांनी दुुरुस्तीची मागणी करणे देखील कठीण झाले आहे.प्रत्येक नागरिकाने पैसे घेतले का ?मनपा निवडणुकीत भरमसाठ पैशांचा वापर झाला हे नगरसेवकाने नागरिकांना दिलेल्या उत्तरातून सिध्द होत आहे. मात्र, प्रत्येक नागरिकाने मतांसाठी पैसे घेतले नाहीत अशा परिस्थितीत नगरसेवकांनी त्यांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. समस्या सोडण्याचे आश्वासन देण्याऐवजी नागरिकांवर ‘मनपा निवडणुकीत पैसे’ घेतल्याचा आरोप केला जात आहे. खड्डेमुक्त जळगावचे आश्वासन देणारे आमदार सुरेश भोळे अशा नगरसेवकांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.उपनगरांमध्ये भीषण स्थितीउपनगरांमध्ये जास्त भयंकर स्थिती पहायला मिळत आहे. अमृत योजनेमुळे खोदण्यात आलेले रस्ते मातीव्दारेच थातूर-मातूर पध्दतीने बुजविण्यात आले आहेत. आता पावसामुळे संपूर्ण माती रस्त्यांवर पसरल्याने चिखल तयार झाला आहे. मुरूम टाकण्यात आला. त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणात मातीच असल्याने चिखलात अधिकच भर पडली आहे. शहरातील जवळ-जवळ सर्वच उपनगरांमध्ये हीच स्थिती पहायला मिळत असून, पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मनपाकडून दुरुस्तीचे काम सुरु असले तरी या दुुरुस्तीचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही.
'पैसे घेऊन मत देता ना...? मग आता खड्डयांवर बोलूच नका!'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 11:51 AM