- आकाश नेवेजळगाव : चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघाडणी केली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांच्यासमोरच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ‘चोपडा मतदारसंघ हा सोडून द्यायचा आहे का,’ असा सवाल केला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षांनी ही बैठक घेतली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अरुण गुजराथी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, वाल्मीक पाटील, योगेश देसले, रिकू चौधरी, अभिलाषा रोकडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चोपडा तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील यांनी चोपडा तालुक्यातील सभासद नोंदणीची माहिती दिली. त्यावेळी पाटील म्हणाले की, चोपडा तालुक्यात इतके कमी सभासद असतील तर कसे होणार, अरुणभाई गुजराथी असताना एवढी कमी संख्या कशी, कुणाकुणाची अब्रू घालवणार आहात तुम्ही, अशा शब्दात पाणउतारा केला. प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की, चोपडा मतदारसंघात यावलचे तीन जि.प. गट येतात. आपल्याला विधानसभा लढवायची आहे की सोडायची आहे. आता तर तिथे आमदारही नाहीत.’ आपले उमेदवार वळवी आले आहेत का, असा प्रश्नही त्यांनी विचारला मात्र वळवी उपस्थित नव्हते. त्यावर वैतागलेल्या प्रदेशाध्यक्षांनी थेट ते आपल्या पक्षात आहेत का, असा प्रश्नच विचारला. तसेच वळवी सभासद नोंदणीला मदत करत आहेत का, असा प्रश्न विचारला; मात्र त्यावर तालुकाध्यक्ष काहीही बोलले नाहीत. अखेर अरुणभाई गुजराथी यांनी हस्तक्षेप केला. गुजराथी म्हणाले की, तालुकाध्यक्षांनी दिलेले उद्दिष्ट दिवाळीच्या काळात अगदी फराळासकट पूर्ण करू.’
संस्थेतील शिक्षकांना नाही कार्यकर्त्यांना कामाला लावाजामनेर तालुक्याचा आढावा घेत असताना तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांच्या कामाचा आढावा घेत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. जामनेर मतदारसंघात विधानसभेत निवडून आणून आणायचा असेल तर संजय गरुड बाहेर पडले. तर जामनेरच्या नेत्यांनी मोहीम केली तर पुढे फायदा आहे. पदाधिकाऱ्यांनी संस्थेतील शिक्षकांना कामाला न लावता आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लावावे.’ अशा शब्दात पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना कामाला लावले.
पारोळ्यात विधानसभा गाठायची आहे ना ?पारोळ्याचे यशवंत पाटील यांनी तालुक्यातील सभासद नोंदणीची माहिती दिली. त्यातील कमी संख्येवरही जयंत पाटील म्हणाले की, एवढी कमी सभासद नोंदणी कशी, आपल्याला विधानसभा गाठायची आहे ना,’ त्यानंतर प्रदेशाध्यांनी माईक माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्याकडे दिला. डॉ. पाटील यांनी सांगितले की, ‘सध्या ही शोकांतिका आहे की आपण ज्यांच्यावर जबाबदारी देतो. त्यांनी काम केले नाही तर काय मान खाली घालावी लागते. आता सगळ्यांनाच कामाला लागावे लागणार आहे. ’ एरंडोल - पारोळा या मतदारसंघातील एरंडोल तालुक्यातील तीनही प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित होते. ते जर काम करत नसतील तर त्यांना नारळ द्यावा, असेही डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटलांचा पुष्पा स्टाईल डायलॉग,‘छोडेगा नही’राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी केलेल्या सदस्य संख्येवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, गेल्यावेळीही याबाबत चर्चा झाली होती; मात्र त्यातून आपण काही बोध घेतला का, आता दंड म्हणून १,००० पुस्तके भरून घ्या, तुम्ही किती सदस्य नोंदवले त्यावर पक्षातील वजन ठरेल. आता मी सगळ्या नियुक्त्या बरखास्त करणार आणि नव्याने नेमणुका करणार आहेत जो पर्यंत मी आहे तो पर्यंत ‘छोडेगा नही’, नंतर अडचण होईल. मग माझ्या जाण्याची वाट बघावी लागेल, असेही म्हणाले.