लीलाई बालगृह येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव : बांभोरी येथील लीलाई बालगृह येथे स्वर्गीय श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशनतर्फे २२ रोजी सकाळी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील अनाथ मुलांना यावेळी राखी बांधून, रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष मिलिंद वाणी यांनी कळविले आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल
जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशनकडून व. वा. वाचनालयामार्गे जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे स्टेशनकडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांचे अधिकच गैरसोय होत आहे. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्यासह पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
आठवडाभरानंतरही व. वा. वाचनालयाकडे जाणारा रस्ता बंदच
जळगाव : एका गटारीच्या कामासाठी गोलाणी मार्केट समोरून व. वा. वाचनालयाकडे जाणारा रस्ता आठवडाभरापासून बंद करण्यात आला आहे. यामुळे व. वा. वाचनालय व या भागातील एका जिमखान्याकडे जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्टेशनकडील रस्त्यावरून जावे लागत आहे. संथ गतीच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने, मनपा प्रशासनाने या संबंधित कामाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे व बसेसला गर्दी
जळगाव : शनिवारी शासकीय कार्यालयांना सुटी असल्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक कुटुंबासह बाहेरगावी जात असल्यामुळे, रेल्वे व बसगाड्यांना सकाळपासून गर्दी दिसून आली. यात विशेषत: मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना गर्दी होती. तसेच जळगाव आगारातून औरंगाबाद, नाशिक, धुळे, मालेगाव, चाळीसगाव या मार्गावर धावणाऱ्या बसेसलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.