जळगाव - घरात सर्व काही असताना एका महिला डॉक्टरांना आगळा - वेगळा छंद जडला आहे. कवी विंदा करंदीकर यांच्या देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... आणि एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे... अशीच एक वेगळी सेवा त्या करीत आहेत.
जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एड्सग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत.
गेल्या काही वर्षापूर्वी त्या मुलींच्या रिमांड होममध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांनी मुलींची नेत्र आणि दंत तपासणीची केली. यातून मग मुलांच्या सेवेचा छंदच त्यांना लागला. एकदा मग जळगावातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांच्याशी त्यांची ओळख झाली. यातून मग एड्सग्रस्त मुलांसाठी काहीतरी करायला हवे, हा विचार पुढे आला. सुरुवातीला त्यांनी एका एड्सग्रस्त मुलाला दत्तक घेतले. मग हळू हळू ही संख्या वाढू लागली आणि आज जवळपास ७० एड्सग्रस्त मुलांना त्या महिन्याला सकस आहार पुरवित आहेत. कधी निधी जमा करुन तर कधी पदरमोड करुन.
जागतिक आरोग्य संघटनेने एड्सग्रस्त मुलांच्या आहारात काय असावे, याचे मागदर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्यानुसार हा आहार दिला जातो. विशेष म्हणजे डॉ. नीलीमा सेठीया यांच्या हाकेला जळगावातील अनेक दाते पुढे आले आहेत. ते दर महिन्याला न चुकता आहारासाठी निधी एकत्र करुन तो त्यांच्याकडे देत असतात. नीलीमा यांनी स्वत: एड्सग्रस्त ११ मुले दत्तक घेतली आहेत. त्यांच्यासह त्या आज जवळपास ७० मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
विशेष म्हणजे दात्यांना कुठलीही शंका नको म्हणून दर महिन्याला या मुलांचे वजन केले जाते आणि मगच त्यांना आहाराचे वाटप केले जाते. मराठे ता. चोपडा येथील आश्रमशाळेलाही डॉक्टरांनी मोठी मदत केली आहे. तीन वर्षापूर्वी त्या या आश्रमशाळेत गेल्या होत्या. त्यावेळी तिथे फक्त एक आठवडा पुरले एवढेच अन्नधान्य होते. डॉ. सेठीया यांना हे कळताच त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना याची माहिती दिली आणि अखंडपणे मदतीचा ओघ सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे.