कोरोना रुग्णालयांमध्येही पीपीई किटचा वापर कमी झाला : तापमानाचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची कमी झालेली भीती आणि वाढत्या तापमानामुळे अनेक आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालण्यास नाखुश दिसून येत आहे. त्यामुळे पीपीई किटचा वापर देखील घटला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णालयांमध्ये पीपीई किटचा वापर केला गेल कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी देखील पीपीई किट घातल्याशिवाय रुग्णांच्या जवळ जात नव्हते. मात्र आता कोरोनाची भीती कमी आणि तापमान वाढलेले असल्याने अनेक आरोग्य कर्मचारी पीपीई किटचा वापर टाळत आहेत.
जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णांवर उपचार करणारी १३० रुग्णालये आहेत. तेथे काम करणारे हजारो आरोग्य कर्मचारी आहेत. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे आवश्यक असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका कमी होतो. हे पीपीई किट घातल्यावर आतमध्ये प्रचंड उकडत असल्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असतात. पीपीई किट पेक्षा कोरोना परवडला असा सूर काही दिवसांपूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये होता. काही मोठमोठी हॉस्पिटल्स ही वातानुकुलित असली तरी जळगावच्या उन्हाळ्यात एसीतही पीपीई किट घालणे हे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना नकोसे झाले आहे.
जीएमसीने मागवले वेगळ्या प्रकारे किट
काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पायघोळ अंगरख्यासारखे पीपीई किट मागवण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना काही अंशी का होईना पण दिलासा मिळाला. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये पूर्वीप्रमाणेच पीपीई किट आहेत.त्यामुळे पीपीई किट घातल्यावर काही मिनिटात डॉक्टर किंवा कर्मचारी घामोघाम होतात.
कोट -
पीपीई किट घातल्यावर काही मिनिटातच घामोघाम होतो. पीपीई किटमुळे एसीमध्ये देखील घाम येतो. त्यावर दुसरा काही उपाय नसल्याने आम्ही बहुतेकवेळा पीपीई किटचा वापर करत नाहीत.
- आरोग्य कर्मचारी
कोट -
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात असलेली कोरोनाची भीती कमी झाली आहे. तसेच प्लास्टिक मटेरियलपासून बनणाऱ्या या किटमध्ये फार उकडते. त्यामुळे अनेकवेळा डॉक्टर, नर्स हे रुग्णांवर उपचार करताना किटचा वापर कमी करत आहेत.
- रुग्णालय व्यवस्थापक
आकडेवारी
कोविड हॉस्पिटल्स १३०
कोविड केअर सेंटर ४०