भारतीय जनता युवा मोर्चातर्फे देशभरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी टेलिकन्सल्टिंग सुविधा व हेल्पलाइनचा शुभारंभ नुकताच झाला. देशातील विविध क्षेत्रांतील नामवंत डॉक्टर्स ही सुविधा गरजू रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेअंतर्गत सर्वसामान्य व कोरोनाने भयभीत झालेल्या नागरिकांशी संवाद साधणे, प्राथमिक व मध्यम स्थितीतील कोरोना रुग्णांना वैद्यकीय सल्ला, उपचार आणि मानसिक समुपदेशन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हेल्पलाइनच्या माध्यमातून ऑक्सिजन बेड उपलब्धता व इतर सुविधांबाबत मदतकार्य आगामी काही दिवस सुरू राहणार आहे, तसेच कोरोना विषाणूविरोधी लसीकरणाबाबत असलेल्या शंका, गैरसमज दूर करणे, योग्य तो सल्ला या माध्यमातून दिला जाणार आहे. वर्षापासून जनजागृतीचे कार्य करणाऱ्या काही मोजक्या डॉक्टरांचा या सेवाकार्यात समावेश करण्यात आला आहे. त्यात डॉ. धर्मेंद्र पाटील व डॉ. नरेंद्र ठाकूर यांचाही समावेश आहे. या राष्ट्रीय टेलिकन्सल्टिंग प्रकल्पाच्या शुभारंभाच्या पूर्वसंध्येला खासदार तेजस्वी सूर्या यांनी व्हिडिओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला.
टेलमेडिसिनच्या माध्यमातून जळगावातील डॉक्टरही करणार देशभरातील रुग्णांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:12 AM