धुळे : वैद्यकीय व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र, पदवी नसताना रुग्णांवर अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करणा:या आनंदखेडा, ता.धुळे येथील बोगस डॉक्टर दाम्पत्याला शुक्रवारी तालुका आरोग्याधिका:यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी प्रेमचंद कपूरचंद बोथरा व त्यांच्या पत्नी भारती बोथरा या दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘शांती क्लिनिक’ नावाच्या दवाखान्यात हे दाम्पत्य अधिकृत पदवी नसताना वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. त्या आनुषंगाने तालुका आरोग्याधिकारी डॉ.राजेश्वर विश्वासराव पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी शांती क्लिनिकची चौकशी केली. त्या वेळी प्रेमचंद बोथरा हे दोन रुग्णांना तपासत होते. त्यांच्याकडे नेब्युलायझर, स्टेथेस्कोप, रक्तदाब मोजणी यंत्र आढळून आले. आनंदखेडा येथे डॉ.राजेश्वर पाटील यांनी पदवी व प्रमाणपत्राविषयी विचारणा केली असता, त्यांनी इलेक्ट्रोपॅथी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती दाखवल्या. अधिकृत पदवी, प्रमाणपत्र नसल्याने पथकाने बोथरा यांच्याकडील साहित्य जप्त केले. पथकात तालुका आरोग्याधिका:यांसह पंच सुनील लांडगे, पद्माकर बागुल, पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. मांडेकर, पोलीस शिपाई विश्वेश हजारे यांचा समावेश होता. याप्रकरणी डॉ.राजेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमचंद बोथरा व भारती बोथरा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 चे कलम 33 (1) (2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
डॉक्टर दाम्पत्याची ‘दुकान’दारी!
By admin | Published: January 09, 2016 12:44 AM