जळगाव दि.24-राज्यात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून त्या बाबत सरकार संवेदनशीलता न दाखविता उलट डॉक्टरांवर कारवाई करीत असल्याने सरकारच्या या असंवेदनशिलतेच्या विरोधात शुक्रवारी जळगाव येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टरांचा मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विविध वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा देत त्यांच्यासह सामाजिक संघटना आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकरांनी काळ्य़ा फिती लावून निषेध नोंदविला. या मोर्चात 600 डॉक्टर, 100 डेंटल असोसिएशनचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे चारशे असे साधारण एक हजार जण सहभागी झाले होते.
धुळे येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर मुंबई, नाशिक, कन्नड अशा वेगवेगळ्य़ा ठिकाणी डॉक्टरांना मारहाणीच्या घटना सुरूच असल्याने आयएमएच्यावतीने डॉक्टरांचा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता आयएमए जळगावच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
आयएमए सभागृहापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या ठिकाणी रोटरी क्लब जळगाव, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, युवा शक्ती फाउंडेशन, मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाउंडेशन यांच्यासह गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, शहरामधील रुग्णालयातील कर्मचारी या ठिकाणी एकत्र आले व मोर्चास सुरुवात झाली.
हा मोर्चा नेहरू चौक, कोर्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी राजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सरकारच्या या असंवेदनशिलतेचा निषेध करण्यात येत असल्याचे मोर्चेक:यांच्यावतीने आयएमएचे माजी राज्य उपाध्यक्ष तथा आयएमए जळगावचे सचिव डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.