एकनाथराव खडसेंना कामांचे श्रेय मिळू नये यासाठी कामे रखडली : डॉ.राधेश्याम चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 03:58 PM2018-10-28T15:58:32+5:302018-10-28T16:02:37+5:30
समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल
जळगाव : समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रश्नी जळगाव फर्स्टच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, समांतर रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवर दररोज सकाळी आठवण करून दिली. आज ६०० वे ट्विट करण्यात आले आहे.
समांतर रस्त्याअभावी अनेकांचे बळी जात आहेत, तरीही याप्रश्नी सत्ताधारी भाजपा असंवेदनशील का आहे? जळगावकरांनी समांतर रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर डीपीआरचे कवित्व सुरू झाले. सुरुवातीला ३६५, त्यानंतर १००, १२५ आणि आता १३९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तो अजूनही मंजूर नाही.
तर महामार्गाचा दर्जा गमावू शकतो
जळगाव शहराच्या बाहेरून बायपास झाल्यावर सध्याचा रस्ता आपला महामार्गाचा दर्जा गमावू शकतो. अशावेळी केंद्र सरकार देखील आपली जबाबदारी झटकेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे भाजपाचे षङ्यंत्र तर नाही असा प्रश्नही डॉ. चौधरी यांनी केला. जळगाव-औरंगाबाद, जळगाव-पाचोरा रस्त्याची कामे युध्दपातळीवर होत असताना चिखली ते फागणे या पट्ट्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी ठेकेदार का मिळू नये? असा प्रश्न डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केला. तसेच समांतर रस्त्याबाबत दिवाळीनंतर आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.
आमदार पटेल भाजपाचे ‘एटीएम’
१८ हजार ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते जळगावात झाले. तेव्हापासूनच लोकप्रतिनिधींमध्ये पत्रकबाजीची स्पर्धा सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसात काम सुरू होईल, असे सांगितले होते.तर गिरीश महाजन दुसरेच काही सांगतात. आमदार भोळे तिसरेच काही तरी सांगतात. निवडणुका आल्या की आमदार चंदुलाल पटेल हे पुढे येतात. आमदार पटेल म्हणजे भाजपाचे ‘एटीएम’ असल्याचाही आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी घेतला.
आमदार सुरेश भोळे यांना ६० टक्के जनमत नाहीच
आमदार सुरेश भोळे हे ६० टक्के जनमत असल्याचे सांगतात. मनपात निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांचे जनमत घ्या पाचही त्यांच्या बाजूने नसतील असा टोलाही डॉ. चौधरी यांनी मारला.
डीपीआरची स्थिती सांगावी अन्यथा माफी मागावी
शहरातील समांतर रस्ते तसेच १८०० कोटींच्या कामांचे श्रेय एकनाथराव खडसे यांना मिळू नये म्हणूनही कामे रखडले असल्याचा आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केला. खडसे म्हणजे जे बोलतो ते करतो अशी त्यांची ख्याती आहे. मात्र त्यांनी कबुल केले ते होऊ नये असा प्रयत्न या पक्षातील काही मंडळींचा आहे मात्र याचा भुर्दंड पाच लाख जळगावकरांना बसत आहे. स्थानिक आमदार व खासदारांनी या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) आजची स्थिती सांगावी किंवा जळगावकरांची माफी मागावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.