जिल्हा बाल निरीक्षण गृह : मुलाच्या भवितव्याबाबत समजावूनही ती महिला ऐकेना
जळगाव : बेपत्ता झालेल्या मुलाला शोधून आणल्यानंतर पोलिसांनी ‘त्या’ मुलाच्या भवितव्याचा विचार करून मातेच्या ताब्यात न देता, जिल्हा बाल निरीक्षण गृहाच्या ताब्यात दिले आहे. जिल्हा बाल निरीक्षण गृह प्रशासनानेही ‘त्या’ बालकाच्या भवितव्याचा विचार करून, मुलाला जिल्हा निरीक्षण गृहातच ठेवण्याची त्या मातेकडे मागणी केली आहे. मात्र, स्टेशनवर पैसे मागून पोट भरणाऱ्या मातेने पोटच्या मुलाच्याही भवितव्याचा विचार न करता, मुलगा ताब्यात मिळण्यासाठी हट्ट धरल्याने जिल्हा निरीक्षण गृह प्रशासनाने कागदपत्रांची कायदेशीर प्रक्रिया केल्यावरच ‘त्या’ बालकाला मातेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सद्यस्थितीला त्या महिलेकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने, मातेची आणि मुलाची भेट लांबणीवर पडली आहे.
रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झालेला मुलगा मुंबईत सापडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी हा मुलगा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी या मुलाला आईच्या ताब्यात न देता, जिल्हा निरीक्षण गृहात दाखल केले आहे. मात्र, बाल निरीक्षण गृह प्रशासनाला या मुलाच्या भवितव्याची चिंता सतावत आहे. जर या मुलाला आईच्या ताब्यात दिले तर, तोही पुन्हा आईसोबत स्टेशनवर प्रवाशांकडून पैसे मागून जीवन जगेल. मुख्य म्हणजे तो शिक्षणापासून वंचित राहून, त्याचा विकास खुंटेल. यामुळे भविष्यात त्याची जीवन जगण्याची दिशाच बदलेल. त्यामुळे या मुलाचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी बाल निरीक्षण गृहातर्फे त्या मुलाच्या आईला बाल निरीक्षण गृहातच राहू देण्याबाबत, समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मंगळवारी बाल निरीक्षण गृह समितीतर्फे त्या मुलाच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या मातेने काही एक न ऐकता माझा मुलगा तत्काळ माझ्या ताब्यात देण्यात यावा, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेईन, असे सांगत त्या महिलेने बाल निरीक्षण गृहात मुलगा मिळण्यासाठी मंगळवारी दुपारी चांगलाच हट्ट लावून धरला.
इन्फो :
मातेच्या ममतेपुढे प्रशासन झाले हतबल
गेल्या महिनाभरापासून जबलपूर येथील एक महिला आपल्या पतीसह दोन लहान बालकांना घेऊन जळगावात उदरनिर्वाहासाठी आली आहे. काजल ठाकूर असे या महिलेचे नाव असून, शिवा ठाकूर हे तिच्या पतीचे नाव आहे. सध्या जळगाव रेल्वे स्टेशनवर हे ठाकूर कुटुंब राहत असून, प्रवाशांकडून कधी पैसे तर कधी खाण्याची जी वस्तू मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. गेल्याच आठवड्यात या महिलेचा सात वर्षीय मुलगा स्टेशन परिसरात खेळत असताना, अचानक बेपत्ता झाला होता. लोहमार्ग पोलिसांनी या बालकाला शोधून आणल्यानंतर, या बालकाच्या भवितव्याचा विचार करता, त्याला त्या मातेच्या ताब्यात न देता, बाल निरीक्षण गृहात दाखल केले आहे. दरम्यान, या मुलाच्या उज्ज्वल भवितव्याबाबत मातेला अनेक वेळा समजावूनही माता ऐकत नसल्याने, या मातेच्या ममतेपुढे प्रशासन हतबल झाले आहे. दरम्यान, याबाबत बाल निरीक्षण गृहाच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैजयंती तळेले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
इन्फो :
मुलाच्या भवितव्याबाबत त्या महिलेला अनेकदा समजावूनही ती महिला ऐकायला तयार नाही. त्यामुळे मुलाला त्या महिलेच्या ताब्यात देण्यासाठी व योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलेला कागदपत्रे आणण्यास सांगितले आहे, तरच त्या मुलाला बाल निरीक्षण गृह प्रशासनातर्फे ताब्यात देण्यात येणार आहे.
-गौतम सोनकांबळे, पोलीस उपनिरीक्षक, लोहमार्ग पोलीस