जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील गोद्री येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत पंधरवड्यापासून एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाकडे कुणी शिक्षक देता का? अशी विनवणी केली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गलथान कारभारावर पालक संतप्त झाले असून, शनिवारी पालकांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले. मात्र गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने त्यांना माघारी परतावे लागले.जिल्हा परिषदेच्या गोद्री येथील उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून, ६० विद्यार्थी प्रवेशित आहेत. गेल्या २४ जुलैपासून शिक्षक नव्हता, एका शिक्षकाची नियुक्ती झाली. मात्र ते आठवडाभर थांबले. त्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून शाळेत एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थी शाळेत येतात व निघून जातात.शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कुणीही दखल घेत नसल्याने शनिवारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालखा तडवी, अरमान पिंजारी, सत्तार पिंजारी, शेख रशीद इब्राहीम, भिकन पिंजारी आदी पंचायत समितीत आले व तसा अर्ज सादर केला.गोद्री हे गाव अवघड क्षेत्रात येते. या ठिकाणी रुजू होण्यास शिक्षक तयार होत नसल्याची माहिती मिळाली.दरम्यान, गटशिक्षणाधिकारी आदीनाथ वाडेकर हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांचा पदभार कुणाकडे सोपविला आहे, याची माहिती पंचायत समितीतील अधिकाºयांकडे नाही. शिक्षण विस्तार अधिकारी आर.पी.दुसाने यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, पदभार कुणाकडे आहे याची माहिती नाही, मात्र गोद्री उर्दू शाळेसाठी जामनेर येथील मुलांच्या उर्दू शाळेतील एका शिक्षकाची नियुक्ती केली असून, ते सोमवारी रुजू होतील.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. शिक्षकांअभावी शाळांना कुलूप लावण्याचे प्रकारही वाढले आहेत.गोद्री उर्दू शाळेत विद्यार्थी दररोज सकाळी येतात, बसतात, खेळतात व घरी निघून जातात. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लक्ष देवून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.जिल्हा परिषदेच्या गोद्री येथील उर्दू शाळेत एकच शिक्षक होतात. त्यांचीही आॅनलाइन बदली झाली. यानंतर येथे शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही. शिक्षकांच्या मागणीसाठी वारंवार पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागतात. गटविकास अधिकारी भेट देत नाहीत. गटशिक्षणाधिकारी रजेवर असून, त्यांचा पदभार कुणाकडे आहे, हे कुणालाच माहिती नाही. यामुळे आम्ही दाद कुणाकडे मागावी?-लालखा तडवी, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, गोद्री, ता.जामनेर
कुणी शिक्षक देता का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 3:01 PM