लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोकाट कुत्र्यांची दहशत शहरात प्रचंड वाढली आहे. यात काही पिसाळलेले असल्याने ती तर नागरिकांच्या जीवावार उठली आहे.
अशातच महापालिका प्रशासनही काहीच ठोस उपाययोजना करता येत नसल्याने ही परिस्थिती गंभीरच होत आहे. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी बघता कुत्रे चावल्यानंतर जखमींना ५५ लाख रुपयांपर्यंत इंजेक्शन देण्यात आली आहे. आता या इंजेक्शनच खर्च केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८६ हजारांपर्यंत जात आहे. त्यामुळे यावर काहीतरी मार्ग काढावा, असाही एक सूर उमटत आहे.
एका मोकाट कुत्र्याने जुने जळगाव व गणेश कॉलनीत ७ जणांना चावा घेतल्यानंतर मोकाट कुत्र्यांच्या त्रासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात दिवसाला सरासरी १५ जण तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. दरम्यान, काहींना अगदी गंभीर चावा या कुत्र्याने घेतला असल्याने दहशतीचे वातावरण आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी शहर व परिसरात लहान बालकांनाही चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे यावर काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.
असे इंजेक्शन अशी किंमत
१ रॅबीपूर : या इंजेक्शनचे कुत्रा चावल्यानंतर किमान ३ ते जास्तीत जास्त ५ डोस जखमीला द्यावे लागतात. या इंजेक्शनची एक व्हायल
शासकीय यंत्रणेला साधारण २५० रुपयात मिळते. एका व्हायलमध्ये साधारण दोन व्यक्तींना डोस देता येतात. काही दिवसांनी पुन्हा त्यांना
बोलावले जाते.
२ ॲन्टी रॅबीज सिरम : ज्यांना अधिक प्रमाणात कुत्र्याने चावा घेतला असेल. तर रॅबीजचे विषाणू शरीरात जाऊ नये म्हणून हे इंजेक्शन
जखमेतच द्यावे लागते. या इंजेक्शनची एक व्हायल साधारण २७५ रुपयांना शासकीय यंत्रणेला प्राप्त होते. हे इंजेक्शन एकाच वेळी दिले
जाते.
दोन्ही इंजेक्शन्सचा खर्च महिन्याला ८६ हजारांवर
रॅबीपूरच्या दिवसाला सरासरी १० व्हायल लागत आहेत. त्यामुळे दिवसाला अडीच हजार रुपयांची इंजेक्शन द्यावे लागत आहे. तर ॲन्टी रेबिज सिरमच्या दोन व्हायल दिवसाला सरासरी लागत आहे. एकत्रित दोनही इंजेक्शनचा खर्च हा महिन्याला ८६ हजारांवर जात आहे.
गेल्या तीन वर्षातील स्थिती
कुत्र्याने चावा घेतलेल्या एकूण व्यक्ती : १४,३७५
पुरुष ७,७११
महिला २,७०८
लहान बालके ३,९५६
केवळ रेबीपूर इंजेक्शनचा खर्च : ५३ लाख ९०,६२५
भीती व मानसिकता खराब
शासकीय यंत्रणेत उपचार मोफत मिळत आहेत, मात्र, रेबीजचा धोका, भीती या सर्व बाबींमुळे सामान्यांची मानसिकताही यामुळे खराब होत आहे. बालकांच्या बाबतीत घटना घडल्यानंतर पालकही दहशतीत येत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच एका मुलाचा रेबीजने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी दोन बालकांना गंभीर चावा घेतला होता. तर एका महिलेच्या चेहऱ्याचा लचका तोडला होता. अशा गंभीर घटना घडतच असून मोकाट कुत्रे जीवावर उठल्याने दहशत वाढली आहे.
निर्बीजीकरणासाठी लागणारा खर्च
कुत्रे : १८ हजारांवर
निर्बीजीकरणाला लागणारा खर्च : ९५२ रुपये प्रति श्वान
एकूण खर्च : १ कोटी ७१ लाख ३६ हजार