लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकापाठोपाठ एक अशा तब्बल पाच जणांना चावा घेऊन लचके तोडल्याची घटना मंगळवारी झाली. त्यात एका वृद्धेसह गर्भवती महिलेचा समावेश आहे. गेल्या दीड महिन्यापासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
येथील मेन रोड भागात पाण्याचा जार घेऊन जात असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धेला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला, त्यापाठोपाठच गर्भवती महिलेला चावा घेतला. गावात अन्य तीन तरुणांनाही चावा घेतला आहे. गावात पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही कुत्र्यांच्या अंगावर तर चर्मरोगाची लागण झाली आहे. अशा कुत्र्यांचा गावात वाढता वावर त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत ताबडतोब उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
दरम्यान, जळगाव, भुसावळसह परिसरातील गावातून पकडण्यात येत असणाऱ्या कुत्र्यांना नशिराबाद हद्दीत सोडून दिले जात असल्याचा आक्षेप नागरिक घेत आहे. त्यामुळेच गावात अचानक कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
दरम्यान, मोकाट कुत्र्यांना नशिराबाद गावालगत सोडू नये त्यावर तुम्ही योग्य ती उपाययोजना करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन माजी सरपंच पंकज महाजन यांनी जळगाव व भुसावळ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.