संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : स्पर्धा परीक्षेत मिळालेले यश पाहून हुरळून जाता कामा नये. पदावर गेल्यावर त्या क्षेत्रातील जबाबदारीची जाणीव ठेऊन त्या क्षेत्रात त्या पदावर आपण जनतेला, समाजाला न्याय देऊ शकतो का? मूळात तो आपला पिंड आहे का ? याचा विचार करूनच कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकावे, असे मत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या मानसी सुरेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. त्या राज्यात द्वितीय आलेल्या आहेत. त्या अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील मूळ रहिवासी आहेत. शालेय जीवन ते यशापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला.प्रश्न : आपले शिक्षण कोठे झाले?मूळची अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील असली तरी वडील जळगावला विद्यानिकेतनमध्ये शिक्षक असल्याने बी.ई.कॉम्प्युटरपर्यंत सर्व शिक्षण जळगावमध्येच झाले.प्रश्न : स्पर्धा परीक्षांची आवड कशी निर्माण झाली?साधारणपणे नववी, दहावीला असताना संदीप साळुंखे आणि राजेश पाटील यांनी मिळवलेले यश वृत्तपत्रात वाचून, बातम्या पाहून आपणही असाच अभ्यास करावा अशी इच्छा झाली.प्रश्न : या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?वडील शिक्षक असल्याने त्यांची आणि काकांची खूप इच्छा होती की मी मोठी अधिकारी व्हावे. त्यातूनच मला प्रेरणा मिळाली.प्रश्न : प्रथम परीक्षा केव्हा दिली आणि यश मिळाले होते का?पदवी मिळाल्यानंतर लगेच २०१५ ला पूर्वपरीक्षेला अर्ज केला. पण परीक्षाच झाली नाही. २०१७ ला मुलाखतीपर्यंत पोहचले. परंतु यश आले नाही. अखेर २०१८ ला विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली.प्रश्न : अभ्यासाचे नियोजन कसे होते?संपूर्ण नियोजन करून आधी अभ्यासक्रम समजून घेतला. दिवसात अभ्यासाचा वेळ निश्चित नव्हता. मात्र आठ-नऊ तास अभ्यास करीत होते. यासाऱ्यात कुटुंबियांचा पूर्ण पाठिंबा होता.प्रश्न : मार्गदर्शन कुणाचे लाभले?एक वर्ष नागपूरला सियाटचे मार्गदर्शन मिळाले. पुण्यात अभ्यास केला. क्लास लावलेला नव्हता. दरम्यानच्या काळात काही दिवस जळगावी मार्गदर्शन लाभलेप्रश्न : विक्रीकर निरीक्षक झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी परीक्षेसाठी वेळ कसा काढला?विक्रीकर निरीक्षक म्हणून रुजू होण्यापूर्वी पूर्वपरीक्षा दिलेली होती. मात्र मुख्य परीक्षेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. काही दिवस रजेची सवलतदेखील दिली. योग्य नियोजन करून कार्यालयीन कामे आटोपून वेळ काढला.प्रश्न : तरुण पिढीला काय सांगावेसे वाटते?समाजाला आपल्याकडून अपेक्षा असतात. आपण ज्या पदावर जे काम करतो त्याची निवृत्त होईपर्यंत जाणीव ठेवली पाहिजे. आपली निवड कशासाठी झाली आहे, याचा विचार करावा. या तीन महिन्यात परिस्थिती बदलली आहे. कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकताना विचारपूर्वक टाकावे. न डगमगता टिकून राहिले पाहिजे आणि मनोबल कमजोर न होऊ देता संयम ठेवला पाहिजे. धीर धरला पाहिजे.
यशाने हुरळून जाऊ नका, संयम आवश्यक : मानसी पाटील यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:04 AM
स्पर्धा परीक्षेत मिळालेले यश पाहून हुरळून जाता कामा नये
ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तींशी संवादसंडे स्पेशल मुलाखतराज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात द्वितीय आलेल्या मानसी पाटील यांचा सल्ला