जळगाव - नवीन वर्ष अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसंच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सेलिब्रेशन करत असतो. विशेष करून आजची तरुणाई सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सेलिब्रेशन करतांना मद्य प्राशन करते. पण बाब चुकीची आहे, मद्य प्राशन करण्यापेक्षा दूध प्यावं, असं आवाहन करत जळगावात 'थर्टीफर्स्ट'चं अनोखं सेलिब्रेशन करण्यात आलं. हा विधायक उपक्रम महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीनं राबवण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने "द दारूचा नाही तर द दुधाचा" हा उपक्रम थर्टी फर्स्टच्या निमित्ताने नुकताच राबविण्यात आला. 31 डिसेंबर या दिवसाला तरुणाई व्यसनाधीन होऊन दारू आणि तस्सम प्रकारचे व्यसन करीत असते. परंतु व्यसन ही वाईट बाब आहे, त्यामुळे व्यसनापासून दूर रहावं, असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने आवाहन करण्यात आलं. "द दारूचा नाही तर द दुधाचा" आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रीय हरित सेना या दोन्ही संघटनांनी शहरामध्ये 31 डिसेंबर हा दिवस अभिनव उपक्रमाने साजरा केला. या उपक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे, आनंद ढिवरे, शक्ती महाजन, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रवीण पाटील, विकास वाघ आदींनी पुढाकार घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना व्यसनापासून परावृत्त करून सामाजिक जाणीव निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.