जळगाव : कष्टकरी बापाचे हाल पाहवत नसल्याने कुटुंबाला आपल्याकडून देखील हातभार लावला जावा यासाठी नेपाळ येथील दोघा अल्पवयीन मुलांनी रोजगारासाठी घर सोडले. मात्र अपेक्षित काम न मिळाल्याने जळगावात दाखल झालेल्या या मुलांनी रेल्वे स्टेशनवरच मुक्काम ठोकला. पोलिसांनी या मुलांची चौकशी केल्यानंतर दोन्ही मुलांची कहाणी समोर आली. दोघांची समजूत घालत त्यांना जळगावातील बालनिरीक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे. अमित आणि संजय अशी या अल्पवयीन बालकांची नवे आहेत.
नेपाळमधील भगवानपूर हे अमितचे गाव असून रोटोवद हे संजयचे गाव आहे. यात अमितचे शिक्षण हे इयत्ता ३ री पर्यंत झाले असून, संजय हा शाळा शिकलेला नाही. मात्र दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती ही सारखीच असल्याने त्यांनी आपल्या शेतकरी बापाला मदत करण्यासाठी गेल्या महिन्यात घर सोडले. विशेष म्हणजे नेपाळ सोडून,पहिल्यांदा थेट मुंबई गाठली. या ठिकाणी गावातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून एका कपड्यांच्या दुकानावर काही दिवस त्यांनी कामही केले. मात्र, मुंबईतील रहदारी आणि त्यात खाण्याची ना राहण्याची व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे त्या दोघांनी मुंबई सोडून जळगाव गाठले.
इन्फो :
जळगावातही बालकांनी कामासाठी केली फिरफिर
‘पोटासाठी दाही दिशा’ या म्हणीप्रमाणे अमित आणि संजय यांनी मुंबई सोडून जळगाव गाठले आणि जळगावातही कुठे काम मिळेल का?, याचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र अनोळखी चेहरे आणि त्यात शहराची कुठलीही माहिती नसल्यामुळे या बालकांना जळगावातही कुठेही काम मिळाले नाही.
इन्फो :
अन् पोलिसांनी काढली बालकांची समजूत
जळगावात कामासाठी सर्वत्र फिरफिर होऊनही, हाताला काम न मिळाल्यामुळे हताश झालेली ही बालके जळगाव स्टेशनवर मुक्कामाला थांबली होती. विशेष म्हणजे या बालकांजवळ पैसे नव्हते. या बालकांवर स्टेशनवरील रेल्वे पोलिसांची नजर पडली. त्यांनी बालकांकडे केलेल्या चौकशीत दोन्ही बालक रोजगारासाठी जळगावात आल्याचे समजले. पोलिसांनी या बालकांना पुन्हा गावी जाऊन शिक्षण घेण्याबाबत समजूत काढली. यानंतर बालकांसाठी काम करणाऱ्या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून या बालकांना जिल्हा बाल निरीक्षण गृहात दाखल केले आहे.
इन्फो :
स्टेशनवर सुरक्षेसाठी असतांना ही दोन्ही बालके फिरताना आढळून आली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते नेपाळहून काम करण्यासाठी आधी मुंबईत आणि आता जळगावात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही बालके अल्पवयीन असल्यामुळे त्यांना, त्यांचे आई-वडील घेण्यासाठी येईपर्यंत जिल्हा बाल निरीक्षण गृहात दाखल केले आहे.
-सचिन भावसार, तपासी अंमलदार,जळगाव लोहमार्ग पोलीस