आनंद सुरवाडे
स्टार डमी : ९२१
जळगाव : पावसाळा सुरू झाला असून, याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विविध विषाणूजन्य आजारांसह पोटांच्या विकारांमध्येही वाढ होत असते, अशा वेळी विशेषत: पावसाळ्यात आहाराच्या बाबतीत अधिक दक्षता घेतलेली आरोग्यासाठी अतिउत्तम असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पावसाळ्यात साथीचे आजार, विषाणूजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. वातावरणातील ओलाव्यामुळे ते वातावरणात अधिक काळ जिवंत राहातात, अशा वेळी लागण होण्याचा धोका अधिक असतो. यात उलटी, जुलाब, ताप हे विकार अधिक उद्भवतात. शिवाय आहाराकडे लक्ष दिले गेले नाही तर पोटाच्या विकारांमध्ये वाढ होते. त्यामुळे पावसाळ्यात याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
पावसाळ्यात हे खायला हवे
- पावसाळ्यात साजूक तुपाचा आहारात समावेश करावा, तूप हे गाईचे असावे.
- पोळी व भातापेक्षा ज्वारीचा अधिक वापर आहारात असावा, गहू व तांदूळ त्यामानाने पचायला जड असतात.
-तुरीच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ आहारात असावी, त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.
- हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचा जेवण बनविणात वापर करावा
- जेवण हे गरम गरम केल्यास या दिवसांमध्ये चांगले असते, शिवाय पाणी नेहमी उकळून थंड करून प्यावे.
- फळभाज्यांवर अधिक भर द्यायला हवा
पावसाळ्यात हे खाणे टाळा
- पावसाळ्यात पचनास जड असे पदार्थ टाळावेत, तेलकट खाऊ नये.
- आंबवलेले पदार्थ टाळावेत, टमाट्याचे प्रमाण कमी करावे.
- आयुर्वेदानुसार हिरव्या पालेभाज्यांचे सेवन पावसाळ्यात करू नये.
- गहू, तांदूळ यांचे प्रमाण कमी करावे.
- लोणचे खाणे शक्यतोवर टाळावे.
- जेवढी भूक असेल त्यापेक्षा कमी जेवण करावे, कारण या दिवसांमध्ये पचनशक्ती ही कमी झालेली असते.
रस्त्यावरचे खाणे धोकादायक
- पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे जीवाणू व विषाणू हे वातावरणात अधिक काळ जिवंत राहतात, अशा वेळी त्यांच्यामुळे होणारे आजारही वाढतात. रस्त्यावरील पदार्थ हे निर्जंतूक नसतात, त्यामुळे त्यांच्यापासून अधिक धोका असतो.
- समोसा, कचोरी, असे पदार्थ खाल्याने आम्ल पित्ताचा त्रास अधिकच वाढतो.
- भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत.
कोट
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वात वाढतो आणि वातच सर्व आजारांचे कारण होतो. या कालावधीत पचनशक्ती कमी झालेली असते. तेव्हा पचनास हलके व कमी जेवण करावे. आंबवलेले पदार्थ, गोड, तेलकट, अतिथंड पदार्थ खाणे टाळावेत. आहारात ज्वारीचा समावेश करावा. गाईचे तूप आहारात घ्यावे. रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावेत.
- डॉ. मिलिंद कांबळे, सहायक प्राध्यापक आयुर्वेद महाविद्यालय
कोट
पावसाळा सुरू झाला आहे. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्याने तसेच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्याने आहाराचे योग्य नियोजन असायला पाहिजे. जेवणात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या गोष्टी असाव्यात. पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे मांसाहारी पदार्थ शक्यतो टाळायला हवे. डाळी, अंडी, मोड आलेली कडधान्ये, यांना प्राधान्य द्यावे.
- डॉ. शाल्मी खानापूरकर, सहायक प्राध्यापिका, औषधवैद्यक शास्त्र विभाग