कोरोना परिणाम : संसर्ग वाढू लागल्याने मुंबई- दिल्लीकडे जाणाऱ्यांची गर्दी ओसरली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. याचा रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, मुंबई, पुणे व दिल्ली मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांकडून दररोज २०० ते २५० तिकिटे रद्द करण्यात येत आहेत. कोरोनाच्या भीतीने ‘रेल्वेप्रवास नको रे बाबा’, अशा प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून उमटत आहेत.
गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यात शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून, यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या परप्रांतीय बांधवांनी घराकडे जायला सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई व पुण्याहून येणाऱ्या रेल्वे गाड्या परप्रांतीयांच्या गर्दीने फुल्ल भरून जात आहेत. तर परप्रांतातून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. तसेच दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस या गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरुन दररोज अप आणि डाऊन मार्गावरील लांबपल्ल्यावरील प्रत्येक गाडीला तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून तिकिटे रद्द केली जात आहेत.
इन्फो :
- दररोज जाणाऱ्या रेल्वे : ३०
दररोज रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या - १ ते २ हजार
- आरक्षण रद्द करणाऱ्यांची रोजची संख्या - २०० ते २५०
इन्फो :
मुंबई, पुणे व दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरली
गेल्या महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असताना, आता तर अधिकच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दररोज ५० ते ६० हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भुसावळ विभागातून मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मात्र, मुंबई व पुण्याकडून जळगाव मार्गे परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मुंबई व पुण्यात वाढलेल्या संसर्गामुळे गावाकडे परतत असल्याचे या परप्रांतीय बांधवांनी सांगितले.
इन्फो :
या गाड्यांना गर्दी कायम
दिवाळीनंतर पहिली लाट कमी झाल्यावर रेल्वे प्रशासनाने मुंबई व दिल्ली मार्गावर अनेक गाड्या सुरू केल्या. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे परप्रांतीय मजूरही परतू लागल्याने या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढल्याने या गाड्यांनी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या उत्तर भारत, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान या भागात जाणाऱ्या काशी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
इन्फो :
कोरोना काळात सर्व गाड्यांना विशेषचा दर्जा
रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात ज्या एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत, त्या प्रत्येक गाडीला विशेषचा दर्जा दिला आहे. या विशेष दर्जामुळे या गाड्यांना तिकीट आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी जनरल तिकीटही बंद करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सुरुवातीपासूनच गाड्यांची संख्या कमी असल्याने, या विशेष गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र, आता कोरोना काळात प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे.
इन्फो :
कोट बाकी आहे..थोडया वेळात देतो.