जळगाव : गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, वातानुकूलित बसमधून हा संसर्ग अधिकच पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांकडून या वातानुकूलित शिवशाही बसमधून प्रवासाला ‘नको रे बाबा’ असे म्हणत हा शिवशाहीचा प्रवास टाळण्यात येत आहे. त्यामुळे शिवशाहीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असल्याचे सांगण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे गेल्या तीन वर्षांपासून पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, औरंगाबाद या मार्गांवर वातानुकूलित अशा शिवशाही बसेस चालविण्यात येत आहेत. सुरुवातीला या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र, साधारण बसपेक्षा या बसचे भाडे जास्त असल्यामुळे, काही महिन्यांतच प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली; तर आता पुन्हा कोरोनामुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली आहे. पुणे मार्गावरही प्रवाशांची संख्या घटल्यामुळे जळगाव आगारातर्फे फक्त औरंगाबाद मार्गावरच सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, या मार्गावरही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. वातानुकूलित शिवशाही बससह साध्या बसेसलाही प्रवाशांचा कोरोनामुळे अल्प प्रतिसाद मिळत आहे.
इन्फो :
पुणे मार्गावरही शिवशाही बंद
पुणे मार्गावर जळगाव आगारातर्फे दोन शिवशाहीर बसेस चालविण्यात येत होत्या. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांकडून वातानुकूलित शिवशाही बसचा प्रवास टाळण्यात येत आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने जळगाव आगारातर्फे पुणे मार्गावरील दोन शिवशाही बसेस बंद करण्यात आल्या असून, या ठिकाणी साध्या बसेस चालविण्यात येत आहेत; तर सध्या या सेवेलाही प्रवाशांचा कोरोनामुळे अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
तीन महिन्यांत ५० टक्के उत्पन्न घटले
जळगाव आगारासह जिल्ह्यातील विविध आगारांतून पुणे, औरंगाबाद व धुळे मार्गावर शिवशाही बसेस सुरू आहेत. यात सध्या जळगाव आगारातर्फे पुणे मार्गावरील शिवशाही बसेस बंद आहेत; तर इतर मार्गांवरील सुरू आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून ज्या मार्गावर या बसेस सुरू आहेत, त्या मार्गावर कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. सरासरीच्या उत्पन्नापेक्षा ५० टक्क्यांवर उत्पन्न आले आहे. त्यामुळे डिझेल खर्चही निघत नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व मार्गांवरील शिवशाही बसची संख्या कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
- जिल्ह्यातील शिवशाही बसेसची संख्या - १८
- सध्या सुरू असलेल्या बसेस - १४
इन्फो :
कोरोनामुळे शिवशाहीच्या प्रवाशांची संख्या घटली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटले असून, महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे; तसेच प्रवाशांअभावी बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे.
- दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, जळगाव विभाग