लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांसाठी जास्तीत जास्त खाटा कशा उपलब्ध होतील, याचे नियोजन करा. यात वेळकाढूपणा नको, आलेला विस्कळीतपणा दूर करा, रुग्णांना सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, अशी तंबी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या यंत्रणेला दिली. कोरोना नियंत्रणासाठी वर्षभरात जे कमावले ते आता विस्कळीतपणाने गमावू नका, असा इशाराही त्यांनी यंत्रणेला दिला.
जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गंभीर रुग्णांना वेळेवर खाटा (बेड) मिळत नसल्याने त्यांची फिराफिर होत आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागा उपलब्ध असतानाही ते पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नसल्याने खाटांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच या ठिकाणी विस्कळीतपणा आल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. त्यात सोमवारी एका गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याने ती रुग्णालय परिसरातच बेशुद्ध होऊन कोसळली होती. या विषयी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. कोरोना काळात अशी परिस्थिती दररोज उद्भवत असल्याने सोमवारनंतर मंगळवारीदेखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट देऊन तेथे सकाळी १० ते दुपारी १२ असे तब्बल दोन तास आढावा घेतला.
विस्कळीतपणा दूर करा
कोरोना नियंत्रणासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. यात रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुधारण्यासह मृत्यूदरही कमी झाला व रुग्णसंख्याही घटली होती. आता पुन्हा संसर्ग वाढत असताना रुग्णांना सुविधा देण्यासाठी योग्य उपाययोजना होणे गरजेचे आहे, यासाठी विस्कळीत पणा दूर करा व वर्षभरात आपण जे कमावले आहे, ते आता गमावू नका, अशी तंबीच जिल्हाधिकारी राऊत यांनी डॉक्टर व सर्व यंत्रणेला दिली.
कार्यक्षमता वाढवा
टास्क फोर्स सदस्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह डॉक्टर, संबंधित संपूर्ण स्टाफ यांची बैठक जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतली. यात रुग्णालयात ११८ नर्सिंग स्टाफ व डॉक्टरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पुढे आणखी डॉक्टर येतील, मात्र आता आहे त्या क्षमतेत व्यवस्थित नियोजन करून रुग्णांसाठी खाटा व उपचार उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. यासाठी कार्यक्षमता वाढवा, सुसूत्रता आणा, या पुढे तक्रार यायला नको, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला सूचना दिल्या.
कारणे सांगू नका, गंभीर रुग्णांना दाखल करून घ्या
रुग्णालयातील सर्व खाटा फुल्ल असल्याने जागा नसल्याचे सांगितले जाऊन गंभीर रुग्णांनाही दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. या विषयी कोणतीही कारणे सांगू नका, लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे नियोजन करून गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध करून द्या, अशा कडक भाषेत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला सूचना दिल्या. उपचार नियमावलीनुसार रुग्णांवर उपचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेेळी सांगत टास्क फोर्सचे मार्गदर्शन घ्या, असा सल्लाही दिला.
काय मदत पाहिजे ती घ्या, वैद्यकीय पातळीवर कमी पडू नका
रुग्णांसाठी खाटा, ऑक्सिजन व आवश्यक ते उपचार कसे उपलब्ध होतील, यासाठी प्रशासकीय पातळीवरील काय मदत लागणार आहे, ती दिली जाईल; मात्र वैद्यकीय पातळीवर कोठेही कमी पडू नका, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी जीएमसीच्या यंत्रणेला सांगितले.
आजपासून कोरोना रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित झाले असून येथे जागा उपलब्ध असली तरी तेथे डॉक्टर व इतर सुविधा नसल्याने आहे त्या जागेचा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे; मात्र या ठिकाणी खाटा उपलब्ध करून देण्यासह आता डॉक्टरही रुजू झाल्याने हे रुग्णालय बुधवार, २४ मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या ठिकाणी ३०० रुग्ण दाखल असून लवकरच रुग्णालयात ४०० रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बेड मॅनेजमेंट प्रणाली सुरू
कोरोनाच्या संकटात कोठे किती खाटा उपलब्ध आहे यासाठी यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये बेड मॅनेजमेंट प्रणाली सुरू झाली असून त्यात उपलब्ध खाटांची माहिती दिली जात असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
————————
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ज्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, त्यांना ते मिळाले पाहिजे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून ज्यांना गरज नाही त्यांनी ती मागणी करू नये, यामुळे वेळेत सर्वांना उपचार मिळणे सोयीचे होईल. शिवाय उपचारासाठी केवळ कोरोना रुग्णालयाचा आग्रह न करता इतरही रुग्णालय अथवा केंद्रात जायची तयारी ठेवली पाहिजे.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.