घरात काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने दुसऱ्या खोलीत झोपलेली सून हर्षा यांनी दरवाजाच उघडला नाही. खिडकीच्या दिशेला जाऊन शेजारीच राहणारे कन्हैया पाटील यांच्या पत्नी संगीता यांना तसेच इतरांना फोन करून माहिती दिली. त्याच वेळी सासूचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. आजूबाजूच्या घरातील लोकांनी बाहेर धाव घेण्यापूर्वीच चोरटे पसार झाले. दरम्यान, कन्हैया पाटील यांनी स्वत:च्या रिक्षातून जखमी भोळे, त्यांच्या पत्नी व नातवाला वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
श्वानने दाखविला ५०० मीटरपर्यंत माग
या घटनेची माहिती मिळताच पहाटे पाच वाजता एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, गोविंदा पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही सहकाऱ्यांनी परिसरातील शेतांमध्ये चोरट्यांचा शोध घेतला. त्यात चार जण असल्याचे सांगण्यात आले. सकाळी श्वान व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. एका ठिकाणी ठसे मिळाले तर श्वानाने शेतात ५०० मीटरपर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. प्रभारी पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनीही घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबाला धीर दिला. घटनास्थळावरच तांत्रिक माहिती घेण्यात येऊन त्यात मिळालेल्या आधारावर तपास पथके रवाना करण्यात आली.
शेजारच्यांच्या घरांना कड्या लावून घरात प्रवेश
गुरुदत्त नगरात दोन वाजता योगेश भानुदास पाटील (३२) यांच्याही घरात चोरट्यांनी याच पध्दतीने प्रवेश केला. कपाटांमध्ये मौल्यवान वस्तूंचा शोध घेत असतानाच योगेश यांना जाग आली. त्यांनी कोण आहे रे.. असा आवाज देऊन शिवीगाळ केली. योगेश यांची शरीरयष्टी पाहून चोरट्यांनी तेथून तसाच पळ काढला. शेजारी दशरथ पुंजाराम पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी शोधाशोध केली. दोन्ही वेळी शेजारच्यांच्या घरांच्या कड्या लावण्यात आल्या होत्या.