लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : तालुक्यात यापूर्वीच विहीरींच्या मुबलक पाण्यावर रब्बी हंगामात पिक पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. या आठवड्यात गिरणा जामदा उजवा व डाव्या कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण ८ हजार ७८४ हेक्टर क्षेत्रावर पिक पेरण्या शेतकऱ्यांनी केली आहे. एकूण ४६८ हेक्टर क्षेत्रासाठी भडगाव तालुक्यात उजवा व डावा कालव्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत.
भडगाव तालुक्यात मोठया प्रमाणात क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. तालुक्यात रब्बी हंगामाच्या पिक पेरण्यात वाढ होत असुन कालव्याचे मुबलक पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. तालुक्यात सिंचन विहीरींसह उजवा व डाव्या कालव्याचे पाणी शेतकरी शेतशिवारात पिकांना भरत असताना नजरेस आहेत. हिरवळीने फुलत असलेल्या रब्बी पिकांनी हिरवे रान आकर्षण बनले आहे. ४ ते ५ दिवसाच्या ढगाळ वातावरण, तुरळक पावसाच्या तावडीतून शेती हंगाम वाचला आहे. शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पन्नाच्या आशा उंचावल्या आहेत. गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी पिकांच्या पेरण्या झाल्या असून पिके वाढीच्या घोडदौडीत वावरत आहेत. भडगाव तालुक्यात सर्वाधिक ज्वारी, हरभरा पिकाच्या पेरण्या झालेल्या आहेत. शेतकरी पिकांची मशागती, रासायनिक खते देणे, औषध फवारणी करणे, पिक निंदणीचे कामे शेतशिवारात करताना दिसत आहेत.
उजवा व डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन या आठवड्यात सुटल्याने तालुक्यात रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण होताना दिसत आहेत. शेतकरी शेतशिवारात कालव्याचे पाणी भरताना दिसत आहे. कालव्यांच्या पाण्याने मोठया प्रमाणात पाण्याचा लाभ होत आहे. डावा कालव्यासाठी एकूण २१८ हेक्टर क्षेत्रासाठी तर डावा कालव्यासाठी एकूण १२० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत. गिरणा जामदा उजवा व डावा कालव्यासाठी एकूण ४६८ हैक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज भडगाव तालुक्यातुन पाटबंधारे विभागास प्राप्त झालेले आहेत,अशी माहिती भडगाव पाटबंधारे विभागाच्या सुत्रानी दिली.
रब्बी ज्वारी सर्वसाधारण क्षेत्र ९११ हेक्टर, पेरणी क्षेत्र २८३४ हेक्टर, गहू सर्वसाधारण ११९४ हे पेरणी १२५० हेक्टर, मका सर्वसाधारण क्षेत्र २८३९ हेक्टर, पेरणी १६५० हेक्टर, हरभरा सर्वसाधारण क्षेत्र ३२७१ हेक्टर, पेरणी ३०५० हेक्टर, एकूण सर्वसाधारण ८२८९ हेक्टर पेरणी ८७८४ हेक्टर पिक पेरण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी दिली.