जळगाव : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील १५०२ गावांची हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या वर आहे. एकाही गावात ५० पैशांच्या आत पैैसेवारी नसल्याने एकाही गावामध्ये टंचाईचे निकष लागू होणार नसल्याचे संकेत असताना जिल्ह्यात अतिपावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हंगामही हातचा गेला आहे. त्यामुळे बळीराजावर हे दुहेरी संकट ओढवले गेले आहे.यंदा जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली तरी आॅगस्ट महिन्यापासून दमदार पाऊस होऊ लागल्याने तो जमिनीत मुरून पिकेही तरारली. त्यामुळे कोठेही कमी पाऊस नसल्याने पैसेवारी ५० पैशांच्यावर आहे. मात्र गेल्यावर्षी जो पाऊस झाला, त्यापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळी झाला होता. त्यानंतर पाण्याअभावी पिकांची स्थिती बिकट होत गेली व हंगामी पैसेवारीमध्ये एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याची स्थिती समोर आली होती. मात्र यंदा दमदार पावसामुळे उलट चित्र असून ते सुखद असले तरी अतिपावसाने घात केला.जिल्ह्यातील जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिपावसामुळे नुकसान झालेले असताना दुसरीकडे एकाही गावाची गावाची पैसेवारी ५० पैशांच्या आत नाही. त्यामुळे ना दुष्काळी निकषाचा लाभ होणार ना पिके हाती येणार अशी स्थिती यंदा बळीराजाच्या नशिबी आली आहे. त्यात पंचनामे करण्याचे काम सुरू असले तरी पीक विमा असो की शासनाची मदत, ती किती व कधी पदरी पडते, याची चिंता बळीराजाला आहे.५० पैशांच्यावर हंगामी पैसेवारी असलेल्या गावांची तालुकानिहाय संख्याजळगाव - ९२, जामनेर - १५३, एरंडोल - ६५, धरणगाव - ८९, भुसावळ - ५४, यावल - ८४, रावेर - १२०, मुक्ताईनगर - ८१, बोदवड - ५१, पाचोरा - १२९, चाळीसगाव - १३६, भडगाव - ६३, अमळनेर - १५४, पारोळा - ११४, चोपडा - ११६.
बळीराजावर दुहेरी संकट : एकीकडे अतिपाऊस, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील सर्व गावातील पैसेवारी ५० पैशांच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:40 PM