‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे़ जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही़’ ‘शिक्षण ही पवित्र संस्था आहे़ शाळेत मने पवित्र होतात़ शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र, ते राष्ट्रीयतेचे, मानवतेचे नी अज्ञानमय दूर करण्याचे उदात्त कार्य आहे़ शिक्षणाविषयी, शिक्षणाची महती, थोरवी आणि शिक्षणात किती ताकद असते’, हे शिक्षणाविषयीचे डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गौरवाद्गारावरून कळून येते़ डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यात जेवढेही कार्यकर्तृत्व केले ते शिक्षणाच्या अधिष्ठानावरच.डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक व महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाचा लेखाजोखा घेताना आपले शिक्षणाविषयीचे विचार सामाजिक, सांस्कृतिकतेच्या अधिष्ठानावर सविस्तर मांडलेले आहेत़प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या संदर्भात म्हणतात, ‘६ ते १४ वर्षांच्या मुलांना शाळेत शिकविण्याची सक्ती केली पाहिजे़ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे़ शिक्षण सर्व जनसामान्यांना मिळावे, यासाठी डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनी शासन दरबारी व लोकमंचावर आपले विचार व्यक्त केले़ सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज स्थापन करून डॉ़आंबेडकर उच्च शिक्षणाविषयी विचार व्यक्त करताना म्हणतात, ‘उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांची गरज आहे़ उच्च शिक्षित पदवीधर देशाचे भवितव्य घडवू शकतात़ त्यांच्यात शिस्त, चारित्र्य, देशपे्रम निर्माण करता येते़’‘व्यक्तीना जाणीव करून देते ते शिक्षण’ अशी समर्पक शिक्षणाची व्याख्या करताना बाबासाहेब म्हणतात, ‘व्यक्तीला अन्यायाविरुद्ध उठाव करण्याचे सामर्थ्य आणि जाणीव केवळ शिक्षणामुळेच होऊ शकते़ स्वत:च्या उद्धार करावयाचा असेल तर शिक्षण घेणे गरजेचे आहे़’ डॉ़आंबेडकर यांनी शिक्षणाला दुधारी शस्त्राची उपमा दिली आहे़ ते म्हणतात, ‘शिक्षण-विद्या ज्याच्याजवळ आहे तो शीलवान असेल तर तो इतरांचे संरक्षण करू शकेल अन्यथा तो दुसऱ्याचा घात करेल़ शिक्षण व्यक्तीला आत्मस्वातंत्र्यासाठी वापरता येईल़ विषमता नष्ट करण्यासाठी, संघर्षासाठी, समतेसाठी, शिस्त व विकासासाठी, चारित्र्य संवर्धनासाठी, मूल्याधिष्ठित, समाज परिवर्तनासाठी, स्त्रियांच्या उद्धारासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते़ बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे नव मानवतावादाचा संस्कार करणारे असावे़ स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार हे परिणामकारक शिक्षणाचे ध्येय असावे़ शिक्षण हाच राष्ट्रीय उन्नतीचा मूलमंत्र आहे़ क्रांती आणि परिवर्तन शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही़ शिक्षण हे सामाजिक क्रांतीच प्रभावी साधन आहे़ म्हणून प्रत्येकाने शिक्षण घ्यायला हवे, असा डॉ़आंबेडकरांचा आग्रह होता़ डॉ़आंबेडकरांच्या शिक्षणविषयक विचारांचा निकष आजच्या शिक्षण पद्धतीला लावला तर पदरात निराशाच पडेल़ बाबासाहेब शिक्षणाच्या व्यापारीकरणाच्या विरोधात होते़ त्यांनी त्याविषयी तत्कालीन सरकारवर टीका करताना म्हटले होते, ‘आपण कला महाविद्यालयावर जेवढा खर्च करतो त्यापैकी जवळपास ३६ टक्के खर्च विद्यार्थी शुल्कातून करतो. माध्यमिक शाळांवर जेवढा खर्च होतो, त्यापैकी जवळपास, ३१ टक्के खर्च विद्यार्थी शुल्कातून होतो़ प्राथमिक शाळांवर जेवढा खर्च होतो त्यापैकी २६ टक्के खर्च विद्यार्थी शुल्कातून होतो़ यावरून डॉ़ आंबेडकरांना स्पष्ट करायचे होते की, शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असून विद्यार्थ्यांना एवढे शुल्क आकारणे म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण होय़
- प्रा.डॉ.के.के. अहिरे