शहरातील शिवाजीनगर भागातील मनपाच्या डॉ.डी.बी.जैन रुग्णालयात महापौर भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाली. सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी वैद्यकीय अधिकारी विजय घोलप या पहिल्या लाभार्थ्यांला लस देण्यात आली. त्यानंतर यादीनुसार क्रमाने परिचारीका व वैद्यकीय अधिका-यांना लस दिली गेली.
दीड-दीड तासाच्या अंतराने चार टप्प्यात लसीकरण
शहरासाठी पहिल्या टप्प्यात १ हजार डोस उपलब्ध झालेले आहेत. प्रत्येक दिवशी चार टप्प्यात प्रत्येकी २५ लाभार्थ्यांना डोस देण्याची व्यवस्था डॉ. डी.बी.रूग्णालयात करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी दीड-दीड तासांच्या अंतराने प्रत्येकी पंचवीस लाभार्थ्यांना लसीकरण केले गेले. परिचारिका गुर्चड ह्या लस देत असताना महत्वाचे चार संदेश लाभार्थ्यांना देत होत्या.
रिॲक्शन आल्यास उपचारासाठी डॉक्टरांचे पथक
सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी पहिला डोस देण्यात आल्यानंतर इतर लाभार्थी कर्मचा-यांना लस देण्यात आली. त्यानंतर अर्धा तास त्यांना १ भुलतज्ञ व ४ वैद्यकीय अधिका-यांच्या निरिक्षणात ठेवण्यात आले. मात्र, तासाभरात कुठलाही त्रास लाभार्थ्यांना उद्भवला नाही.
गंभीर त्रास जाणवल्यास हा केला जाईल उपचार
लस दिल्यानंतर खाज येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, ताप येणे, सूज येणे असा काही त्रास झाल्यास तात्काळ उपचारासाठी डॉ. डी.बी. जैन रूग्णालयात कक्ष तयार केले आहे. गंभीर रिॲक्शन आल्यानंतर त्या पाच वैद्यकीय अधिका-यांच्या पथकाकडून ऍड्रीनालीन इंजेक्शन दिले जाईल. त्यानंतर हायड्रोक्वॉर्टीसॉन हे इंजेक्शन दिले जाणार आहे. लाभार्थ्यांना लस दिल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळत बसविण्यात आले होते. पहिल्या तासाभरात बारा लाभार्थ्यांना लस देण्यात आली होती. त्यांना कुठलाही त्रास जाणवला नाही.
ओळखपत्र तपासूनचं प्रवेश
मनपाच्या डॉ. डी.बी. जैन रूग्णालयात प्रवेश केल्यानंतर पोलिसांकडून लाभार्थ्यांचे ओळखपत्र तपासले जात होते. त्यानंतर हात सॅनिटाईज करून प्रवेश दिला जात होता. त्याठिकाणी संमती पत्र भरून घेण्यात आले. शेवटी यादीनुसार लसीकरणासाठी लाभार्थ्यांस पाठविण्यात येत होते. त्यानंतर शासनाच्या सॉफ्टवेअरमध्ये ओळखीचा पुरावा घेतला जाऊन माहितीची भरली जात होती. त्यानंतरच लस दिली जात होती.
लाभार्थ्यांना लस दिल्याचा प्राप्त झाला एसएमएस
ज्या शंभर विद्यार्थ्यांना शनिवारी लस देण्यात येणार होती, त्यांना एक दिवसाआधी एसएमएस पाठविण्यात आला होता. तसेच लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा एसएमएस प्राप्त होत हाेता. आणि एक प्रमाणपत्र देखील पाठविण्यात येत होते. आता लाभार्थ्याला महिन्याभराने दुसरा डोस देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी, महापौरांनी घेतला आढावा
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील येऊन आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, आयएमएचे स्नेहल फेगडे, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.संजय पाटील, डॉ.विजय घोलप, डॉ.सायली पवार, डॉ.नेहा भारंबे, डॉ.सोनल कुळकर्णी, डॉ.पल्लवी पाटील, डॉ.पल्लवी नारखेडे आदींसह सर्व रुग्णालय सेविका, कर्मचारी उपस्थित होते.
आठवडाभरात होऊ शकते केंद्र स्थलांतर
डॉ. डी.बी.जैन रूग्णालयातील लसीकरण केंद्र आठवड्याभरानंतर शहरातील एका रूग्णालयात स्थलांतर होण्याची शक्यता आहे. गंभीर त्रास उद्भवल्यास तात्काळ उपचार मिळावे आणि लाभार्थ्यांना सोयीस्कर व्हावे या उद्देशाने स्थलांतर करण्यात येऊ शकते. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
आयएमएचे डॉक्टर मदतीला
लसीकरणावेळी काही त्रास उद्भवल्यास उपचारासाठी आयएमएच्या डॉक्टरांकडून मदतीचा हात दिला जाणार आहेत. त्यामुळे काही केंद्रांवर या डॉक्टरांना सु्ध्दा बोलविण्यात आले आहेत.