जळगाव : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात जळगावचे डॉ. हेमकांत बाविस्कर यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरू - नेत्र चिकित्सा’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील तीन निवडक राष्ट्रीय आयुर्वेद गुरूंपैकी दोन केरळचे आहेत, तर महाराष्ट्रातील डॉ. बाविस्कर हे एकमेव आहेत.
डॉ. बाविस्कर म्हणाले की, नेत्रविकारांसाठी ते स्वत: आणि केरळ येथील नारायण नंबूदिरीपाद हे संपूर्ण भारतात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यताप्राप्त आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ आहेत. काचबिंदू, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना वारंवार सूज येणे, लहान मुलांच्या डोळ्यांच्या नंबरमध्ये सतत होणारी वाढ, मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारा परिणाम यावर ते यशस्वी उपचार करत आहेत. आयटी क्षेत्र व इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या आहे, त्यावर आयुर्वेदिक औषधोपचार करता येतात.
अशी होते निवड
भारत सरकारकडून दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद गुरूची निवड केली जाते. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ संचालक समितीतर्फे डॉ. गुप्ता व डॉ. हरीश सिंग यांनी जळगावमध्ये येऊन डॉ. बाविस्कर यांचे वैद्यकीय कार्य, आयुर्वेदातील संशोधन व आयुर्वेदासाठी असलेली सामाजिक जाणीव याची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती झाली आहे.