जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक-सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या नावाने जळगावात नवं गाव अस्तित्वात आलं आहे. 1989 मध्ये संघाचे संस्थापक- सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या नावाने एक छोटसं नगर स्थापन झालं होतं, आज याच नगराचं रूपांतर स्वतंत्र गावात झालं आहे. दरम्यान, डॉ. केशव हेडगेवार यांच्या नावाने अस्तित्वात आलेलं हे देशातलं पहिलं गाव आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात हे डॉ. केशव हेडगेवार गाव आहे. धरणगाव शहराजवळ एरंडोल रस्त्यावर हे गाव आहे. 2018 पासून खऱ्या अर्थाने या गावाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाले. राज्यातील शिंदे सरकारने आपल्या दुसऱ्याच कॅबिनेटच्या बैठकीत संघाचे संस्थापक-सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या नावाने नव्या गावाच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला.
आता गॅझेटमध्ये नव्या गावाची नोंद झाली असून, त्याला महसुली गावाचा दर्जा दिला आहे. लवकरच गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होणार आहे. विशेष म्हणजे, या गावात संघ विचारांचे लोक रहिवासी आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे अडीच हजार इतकी आहे. आता राज्य शासनाने गावात मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.