लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : परवानगीशिवाय अधिक रुग्ण दाखल करणे, मान्यता रद्द असलेल्या काळात कोविड रुग्णांवर उपचार करणे या तक्रारी भरारी पथकाच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने डॉ. नीलेश किनगे यांच्या कोविड रुग्णालयाची मान्यता निलंबित करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी शनिवारी दिले. भरारी पथकाने शनिवारी दोन तास डॉ. किनगे यांच्याकडे चौकशी करून कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर हा आदेश देण्यात आला.
डॉ. किनगे यांनी त्यांच्या मूळ ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलच्या दुसऱ्या इमारतीत कोविडचे उपचार सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे दाखल रुग्णांकडून काही तक्रारी समोर येत होत्या. याबाबत सोशल मीडियावरही त्यांनी दिलेली कच्ची बिले व्हायरल करण्यात आली होती. शिवाय शासकीय दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याच्याही तक्रारी होत्या. या सोशल मीडियावरील तक्रारी व बिलांच्या अनुषंगाने रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. त्यानुसार भरारी पथकाचे प्रमुख जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जयकर आणि उमेश देशमुख यांनी डॉ. किनगे यांच्याकडे दोन तास चौकशी केली.
या गंभीर बाबी आढळल्या
भरारी पथकाचे प्रमुख डॉ. विलास जयकर, उमेश देशमुख यांनी शनिवारी दुपारी दोन तास ॲपेक्स रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये चौकशी केली. सर्व कागदपत्रे तपासली. यावेळी त्यांना १५ बेडची परवानगी असताना या ठिकाणी २५ रुग्णांवर उपचार सुरू होते. शिवाय डॉ. किनगे यांच्यासह अन्य डॉक्टर विना पीपीई किट रुग्णांची तपासणी करीत होते. यासह १७ जानेवारीला मान्यता रद्द करण्यात आलेली असतानाही २१ फेब्रुवारीपर्यंत रुग्ण दाखल असल्याचे रजिस्टर तपासणी आढळून आले. यासह आवश्यकतेपेक्षा अधिक ऑक्सिजनचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
असे आहेत आदेश
या बाबी गंभीर असून पुढील आदेशापर्यंत मान्यता निलंबित करण्यात येत आहे. त्यामुळे आजपासून कोविड रुग्ण दाखल करू नये व दाखल असलेले रुग्ण डिस्चार्ज पॉलिसीनुसार डिस्चार्ज करावे, असे न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी काढले आहेत.
दरम्यान, भरारी पथकाने तक्रारीनुसार सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. रुग्णांच्या ज्या तक्रारी सोशल मीडियावर प्राप्त झाल्या होत्या, त्यात तथ्य होते, असे भरारी पथकाच्या डॉक्टरांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी व रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द करावी, असा अहवाल भरारी पथकाने दिल्याची माहिती आहे.
कोट
रुग्णाला दिलेली बिले ही तात्पुरती दिली होती. आम्ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ओरिजनल बिल देतो. शिवाय ज्या रुग्णाबाबत तक्रार होती त्या रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह होता. तो रुग्ण एसी डिलक्स रूममध्ये होता. अशा स्थितीत शासकीय दर कसे लावणार. परवानगीपेक्षा दोन, तीन रुग्ण अधिक दाखल आहेत. मात्र, आम्ही बेड वाढविण्याची परवानगी मागितली आहे. सर्व परवानगी आम्ही घेतल्या आहेत. अशा स्थितीत पूर्ण ताकदीने सेवा देत असताना अशा तक्रारी झाल्याने मॉरल डॉऊन होते.
-डॉ. नीलेश किनगे