जळगाव : मुंबईत नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून झाला आहे. तिच्या वरिष्ठ सहकारी असलेल्या तीन महिला डॉक्टरांनी तिचा खून केला आहे, असा आरोप डॉ. पायलचे पती सलमान तडवी, आई आबेदा व वडील सलीम तडवी यांनी केला आहे.‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी डॉ. पायल हिच्या कुटुंबाची वाघ नगरातील घरी भेट घेतली. त्यांनी पायलच्या छळाचा पाढाच वाचला. डॉ.पायल हिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वरिष्ठ सहकारी विद्यार्थिनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर व डॉ. अंकिता खंडेलवाल उच्च घराण्यातील असून त्यांना अद्यापही अटक झालेली नाही. त्यांना तत्काळ अटक करून डॉक्टरकीची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.पायल हिचे पती सलमान तडवी नायर हॉस्पिटलपासून नजीकच असलेल्या विलेपार्ले येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. त्याच परिसरात त्यांनी भाड्याने घर घेतले होते. इतक्या जवळ असतानाही तिघी पायलला पतीला भेटू देत नव्हते. डॉ. पायल यांचे १४ फेब्रुवारी २०१६ रोजी सलमान तडवी (रावेर) यांच्याशी विवाह झाला होता.पायलला सहकाऱ्यांकडून असह्य त्रास होत असल्याने आई आबेदा यांनी मुंबई गाठून अधीष्ठांताची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटूच दिले नाही. जी तक्रार असेल ती टपालात टाका, त्यानंतर दहा दिवसांनी चौकशी करा असे सांगण्यात आले. त्यामुळे आबेदा तडवी यांनी एक दिवस तेथेच थांबून विभाग प्रमुख शिरुडे व अध्यापन करणा-या महिला प्राध्यापकांकडे तक्रार केली. यावर असे प्रकार होतच राहतात, तिला सहन करावेच लागेल असे उत्तर मिळाल्याचे आई आबेदा यांनी सांगितले.
'डॉ.पायलची आत्महत्या नव्हे, खूनच!'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:06 AM