लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यभरातील १९ जिल्हा परिषदा आणि २७ पंचायत समित्यांमधील ६० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यात रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रूक- विवरा बुद्रूक गटासह यावल तालुक्यातील दहीगाव-साकळी व भालोद-अट्रावल या गणांचा समावेश आहे. राज्यभराचा हा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी शुक्रवारी जाहीर केला आहे.
मतदार याद्यांवर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, त्यानंतर ५ मार्च रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या १० मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. वाघोदा बुद्रूक-विवरा बुद्रूक गटात तत्कालीन सदस्य आत्माराम कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्यात आले होते. यासह यावल तालुक्यातील एका गणात जातवैधता प्रमाणपत्र तर एका गणात विरोधी सदस्याला मतदान केल्याच्या तक्रारीवरून सदस्यांना अपात्र करण्यात आले होते. साधारण वर्ष, दीड वर्षांपासून या जागा रिक्त होत्या.