सावखेडा, ता.रावेर : येथील कुंभारखेडा रस्त्यावर रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तींना १० रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिनविषारी अजगर आढळला.हे दोघे रस्त्याने जात असताना त्यांना वाटेतच एका युरियाच्या थैली मध्ये काहीतरी असल्याचा आवाज आला व त्यांनी जवळ जाऊन बघितले तर त्यातून फुस फुस असा आवाज येत होता. ही चर्चा सावखेडा येथील वन्यजीव मित्र चेतन चौधरी व वन्यजीव प्रेमी गोपाल पाटील यांच्या कानावर आली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व थैली उघडून बघितले असता अजगर जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला. याबाबत वन अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. याप्रसंगी युवा सेना तालुकाप्रमुख किरण पाटील उपस्थित होते.दरम्यान थैली मध्ये अजगराला कोंबून एका अज्ञात ठिकाणी ज्यांनी ठेवले,व नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी जळगाव येथील वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी केली आहे.
थैलीमध्ये आढळला अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 4:16 PM