माणसाच्या जगण्याला ज्या काही संघर्षाच्या रंगछटा आहेत त्या अगणित छटांचे इंद्रधनुष्य रंगभूमीच्या नभपटलावर जेव्हा झळकते तेव्हाच नाटकाचा खरा साथी प्रेक्षक तो दृष्य अविष्कार पाहून आनंदाने बहरून जातो.मानवी जीवन हे संघर्षाने भरलेलं आहे. पदोपदी त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो आणि हा संघर्ष त्याच्या इतका रक्तात भिनलेला आहे की आपण सतत संघर्ष करतोय याची जाणीव तो विसरलाय. एखादे वेळेस असा संघर्ष जर त्याला नाही अनुभवता आला तर त्याला त्याचे आयुष्य कंटाळवाणे, सपक वाटू लागते. संघर्ष हा त्याचा स्थायीभाव झालेला आहे. मग हा संघर्ष त्याच्या जगण्यातल्या प्रत्येक कृतीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या रिफ्लेक्ट होत असतो. मग त्यातून नाटक कसे बरे वेगळे राहू शकते? नाटक म्हणजे जीवनाचा आरसा आहे हे म्हटल्यावर जीवनात जे काही म्हणून घडते ते सगळं नाटकात तंतोतंत उतरत असते. जणू आयुष्याचे प्रतिबिंबच म्हणाना!लेखकाच्या मनातला संघर्ष हा नाटक रूपाने कागदावर उमटतो. हा संघर्ष एकाकी नसतो किंवा एकाच बाजूने नसतो. घर्षण होण्यासाठी किमान दोन वस्तू किंवा बाजू लागतात. साधं आगपेटीची काडी पेटवण्यासाठी काडी व आगपेटीची गुल लावलेली कडा अपेक्षित आहे. तरच काडी पेटते. तसच नाटकातल्या संघर्षाचं आहे. सर्व साधारण पाहिले असता पहिला संघर्ष जो दिसतो तो व्यक्ती विरुद्ध व्यक्ती असा असतो. किमान दोन माणसातला संघर्ष येथे अभिप्रेत आहे. मग व्यक्ती विरुद्ध समाज असू शकतो. सर्व साधारणपणे दृश्य स्वरूपात हा संघर्ष व्यापक प्रमाणावर दिसतो. यातला संघर्ष मग तो वैचारिक, अभिलाषा, द्वेष, वैर, मतभिन्नता किंवा शारीरिक सुद्धा असू शकतो. माणसांचा समूह हा सुद्धा प्रतिद्वंद्वी म्हणून समोर असतो.दुसरा संघर्ष हा व्यक्ती विरुद्ध प्रवृत्ती असा आहे. पुरातन काळापासून म्हणा किंवा आजच्या म्हणा ज्या काही प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेत ज्या मानवी जीवनाच्या सुखाला, प्रगतीला बाधक आहेत त्याच्या विरुद्ध मानवाचा सजगतेने केलेला संघर्ष हा सुद्धा तितकाच सनातन आहे आणि तीव्र आहे. त्या बुरसटलेल्या प्रवृत्ती विरुद्ध मानवाने संघर्ष केलेला आहे आणि करत आहे. तिसरा संघर्ष हा व्यक्ती विरुद्ध नियती असा दिसून येतो. माणसाची डेस्टिनी ही शेवटी माणसाच्या जगण्याला अदृश्यरितीने नियंत्रित करीत असते ग्रीक रंगभूमीवरील सगळी नाटके शोकांतिका या नाट्यप्रकारात मोडणारी असून माणूस नियतीच्या हातचं बाहुलं आहे असा मेसेज त्याच्या प्रत्येक नाटकात पहायला मिळतो.इथं माणाचा संघर्ष हा नियतीविरुद्ध पहायला मिळतो. मानव कितीही जरी कर्तृत्वाने जरी मोठा झाला तरी त्याचं खुजेपण नियती त्याला दाखवून देत असते आणि चवथा संघर्ष हा व्यक्ती विरुद्ध स्व असा आहे. इतर संघर्षात समोर कोणीतरी दुसरी व्यक्ती किंवा विचार नसून यात माझाच माझ्याविरुद्ध झगडा आहे. माणसाला जेव्हापासून कळायला लागतं तेव्हापासून हा झगडा सुरू आहे. मीच माझा दुश्मन होत असतो. मनात होय आणि नाही यात संघर्षाचे वादळ सतत सुरू असते. यात कधी हा चा विजय असतो तर कधी नाही चा असतो. श्री संत तुकाराम म्हणतात... तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. तसा हा वाद, संघर्ष आपला आपल्याशीच असतो आणि हे खरे मानवाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. नाटकात बाकी सगळ्या प्रकारचे संघर्ष दाखवणे हे एकवेळ सहज शक्य असते पण आपला आतला संघर्ष हा शब्द आणि कृतीच्या सहाय्याने रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात प्रकट करणे ही खरोखरच कसबी कारागिरी आहे.जसं संघर्षाविना जीवन अळणी होते तसेच संघर्ष नसलेलं नाटक हे अप्रिय होतं. नाटकात झगडा हा विविध प्रकारचा असतो. मग तो लालसेतून असेल, असूयेतून असेल, लोभातून, द्वेषातून, तिरस्कारातून इ. असे अनेक कारणं संघर्षाची देता येतील. माणसाच्या जगण्याला ज्या काही संघर्षाच्या रंगछटा आहेत त्या अगणित छटांचे इंद्रधनुष्य रंगभूमीच्या नभपटलावर जेव्हा झळकते तेव्हाच नाटकाचा खरा साथी प्रेक्षक तो दृष्य अविष्कार पाहून आनंदाने बहरून जातो.-हेमंत कुलकर्णी, जळगाव
नाटकातला संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 3:54 PM