आडगाव ता. चाळीसगाव : अंगणवाडी ही फक्त खाऊचे केंद्र नसून ते एक उत्कृष्ट नागरिक, माता, भगिनी यांचे आरोग्य व जीवनस्तर उंचावण्याचे एक मोठे केंद्र आहे. सर्वांनी मनावर घेतल्यास स्वप्नातील अंगणवाडी तयार होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहे.
आडगाव येथे त्यांनी नुकतीच अंगणवाडीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. वाळेकर यांनी देवळी व आडगांव येथिल एक- एक अंगणवाडी स्वतःच्या व तिथल्या ग्राम पंचायतीच्या सहकार्यातून आदर्श अंगणवाडी करण्याचा निर्णय घेतला, रंगरंगोटीपासून तर आतील शैक्षणिक साहित्य, बालसाहित्य, बालकांचा ड्रेस कोड, एक पाण्याची बाटली, शुज, कुपोषणमुक्त गाव, अनेमियामुक्त किशोरवयीन मुली, सँम,मँमचे लाभार्थी नको, या सर्व गोष्टींची पूर्तता या अंगणवाडीकडून ते करून घेणार आहेत. रविवारी त्यांनी आडगाव येथिल अंगणवाडींना भेट देऊन सूचना केल्या. यावेळी सरपंच रावसाहेब पाटील, ग्रामसेवक विजय पाटील, सेविका प्रतिभा पाटील, मदतनीस वंदना पाटील, शिपाई देवचंद पाटील, तुळशीराम रहिले हे उपस्थित होते.