मुक्ताईनगर : महिला राज असलेल्या तालुक्यातील चिंचखेडे बु.।। येथील पूरग्रस्त वस्तीमध्ये पाणीपुरवठा योजना थेट सौर ऊज्रेवर कार्यान्वित करून ग्रामस्थांना पाणी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यही महिला असलेल्या या ग्रा.पं.ने तंत्रज्ञानाची कास धरत मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. मुक्ताईनगर-कु:हा रोडवरील चिंचखेडे बुद्रूक हे दोन हजार वस्तीचे गाव. मुख्य रस्त्याला लागून पुनर्वसित चिंचखेडे बु.।।, तर रस्त्याच्या पलीकडे जंगलाच्या गावरानाच्या कुशीत पूरग्रस्त चिंचखेडे. या पूरग्रस्त वस्तीत साधारण 50 च्या आसपास कुटुंबांचा रहिवास. येथे पिण्याच्या पाण्यासाठी परिस्थिती तशी बेताचीच होती. या प्रतिकूल परिस्थितीत गावाचा गाळा हाकण्याची धुरा महिलांच्या हाती आली. तीन वॉर्ड, सात ग्रा.पं. सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये तीन जागा अनुसूचित जमातीच्या रिक्त आहेत. तर उर्वरित चारही जागांवर महिला सदस्या निवडून आल्या आहेत. सरपंचपदाची धुरा भाग्यश्री पंडित पिळोदेकर तर उपसरपंच सुरेखा नितीन पाटील. सदस्या म्हणून पूनम वाघ, रेणुका निकम. या चार महिला ग्रा.पं.चा कारभार चालवत आहेत. भाजपाच्या ताब्यातील या ग्रामपंचायतीच्या पूरगस्त वस्तीतील पाणीपुरवठा समस्या सोडविण्यास सरपंच भाग्यश्री पिळोदेकर यांनी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सौर ऊज्रेवर आधारित दुहेरी पंप लघु पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा योजना राबविली. सौर ऊज्रेवर चालणारे पंप. टय़ूबवेल बसवून स्वतंत्र पाण्याची टाकी वितरण व्यवस्थेत सार्वजनिक नळ आणि खाजगी नळ कनेक्शन अशा स्वरूपात ही योजना आकारास आली आहे. इलेक्ट्रिक खर्चाची दगदगही नाही आणि संपूर्णत: सूर्यप्रकाशावर थेट पाणी योजना असल्याने भारनियमनाचा मनस्तापही नाही. मुख्य जलकुंभ भरला की, पंप बंद करणे आणि खाली होताच भरून घेणे अशा स्वरूपात पाणी वितरण येथे होणार आहे. अशा या नावीन्यपूर्ण उपक्रमातून पूरग्रस्त चिंचखेडे बु.।। चा पाणीप्रश्न सुटला आहे. महिला राज असलेल्या ग्रा.पं.ने तंत्रज्ञानाची कास धरून सोडविलेला पाणीप्रश्न नक्कीच कौतुकास्पद आहे. यातून इतरांनी आदर्श घ्यावा अशी ही योजना आहे. (वार्ताहर)
सौर ऊज्रेवर होतोय पाणीपुरवठा
By admin | Published: January 12, 2016 12:34 AM