जळगाव : जळगावकरांनो, महामार्गावरुन वाहन चालविताहेत..तर मग सावधान..शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग धोकेदायक व जीवघेणा ठरत चालला आहे. या महामार्गाने अनेक बळी घेतले आहेत. तरुण मुले, नोकरदार, महिला या अपघातात ठार झालेल्या आहेत. कुटुंबातील कमावत्या व्यक्ती या महामार्गाने कायमच्या नेलेल्या आहेत. याच महामार्गावर शिवकॉलनी व तरसोद फाटा हे दोन तर धुळे-चाळीसगाव महामार्गावर चिंचखेड फाटा १ असे तीन ब्लॅक स्पॉट अनेक वर्षापासून जाहिर झालेले आहेत.
खरे तर पाळधी ते नशिराबाद या दरम्यान अनेक अपघात झाले असून त्यात निष्पाप वाहनधारकांचे जीव गेलेले आहेत तर काहींचे अवयव कायमचे निकामी झालेले आहेत.
२०२० मध्ये जिल्ह्यात ७२१ अपघात झाले असून त्यात ४७१ जणांचा बळी गेलेला आहे. ३७७ जण किरकोळ तर १९१ जण गंभीर जखमी झालेले आहेत. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावरच झालेले आहेत. धरणगाव तालुक्यातील एकलग्न, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा व पारोळा या ठिकाणी देखील अपघातांचे व जीव जाण्याचे प्रमाण अधिक आहे, मात्र ते अद्यापही ब्लॅक स्पॉट जाहिर झालेले नाहीत. रस्त्यावरील साधारण ५०० मीटरचे अंतर जेथे मागील तीन वर्षात ५ रस्ते अपघात झालेले आहेत (ज्यात व्यक्ती जखमी अथवा मृत झालेले आहेत.) तसेच जेथे मागील ३ वर्षात रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावलेल्या आहेत, ही ब्लॅक स्पॉटची व्याख्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाने निश्चित केलेली आहे.
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट : ३
२०२० मध्ये झालेले अपघात :७२१
अपघातातील मृत्यू : ४७१
मागील वर्षी अपघातांची संख्या
जानेवारी :६७
फेब्रुवारी :६४
मार्च : ५१
एप्रिल : २२
मे : ५०
जून : ५९
जुलै : ५७
ऑगस्ट :६३
सप्टेबर : ५८
ऑक्टोबर :६७
नोव्हेंबर : ७८
डिसेंबर : ८५
पाळधी ते नशिराबाद वाहन जपून चालवा
राष्ट्रीय महामार्ग सहा अत्यंत घातक ठरत असून पाळधी ते नशिराबाद या दरम्यान अपघातांची संख्या जास्त असून शिवकॉलनी व तरसोद फाटा हे दोन ठिकाणे ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत. दोन महिन्यापूर्वीच अजिंठा चौक ते इच्छा देवी चौक या दरम्यान दोन अपघात झाले असून त्यात दोघांचा जीव गेलेला आहे.
असे आहेत ब्लॅक स्पॉट
जळगाव : २
चाळीसगाव : १
राष्ट्रीय महामार्ग ६ वर सर्वाधिक बळी
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरच सर्वाधिक अपघात व बळी गेलेले आहेत. साधारण पारोळा ते भुसावळ हे अंतर अत्यंत घातक आहे. त्यातल्या त्यात बांभोरी ते नशिराबाद दरम्यान जास्त बळी गेलेले आहेत.