जळगाव : शहराच्या दैैनंदिन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी चालकांनी बुधवारी वेतन रखडल्याने पुन्हा कामबंद आंदोलन केले. त्यामुळे बुधवारी शहरात कोणत्याही भागात कचरा संकलनासाठी घंटागाडया पोहचल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा शहरात कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वेतनाच्या मुद्यावरून हा मक्ता सुरु झाल्यानंतर सात महिन्यांचा काळात तब्बल १६ वेळा घंटागाडी चालकांनी संप पुकारला आहे.दैनंदिन साफसफाईच्या मक्ता दिल्यानंतर मनपा प्रशासन, मक्तेदार व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे हा मक्ता चर्चेत असून, स्वच्छतेबाबतचे नियोजन करण्यास प्रशासन व मक्तेदारांला पुर्णपणे अपयश आले आहे. प्रशासन मक्तेदारावर खापर फोडत आहे. तर मक्तेदाराकडून प्रशासनावर खापर फोडले जात आहे. या वादामुळे सर्वसामान्य जळगावकरांनाच त्रास सहन करावा लागत आहे. फेब्रुवारी व जानेवारी महिन्याचे वेतन न मिळाल्याने बुधवारी ८५ घंटागाडी चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे शहरातील एकाही घरातील कचरा संकलन होवू शकला नाही. चालकांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर प्रशासनानेही कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे अधिकच भर पडली.
घंटागाडी चालकांनी १६ वेळा ठेवले कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:43 PM