जळगाव : मलकापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाला मद्याची तर्रर्र नशा चढल्याने या नशे चालकाने थेट नेरी ते जळगाव रेल्वे स्थानक या दरम्यान कशाचीही परवा न करता सुसाट वेगाने वाहन चालवित २५ कि.मी. अंतरामध्ये तब्बल ३५ वाहनांना उडविल्याचा थरार रविवारी दुपारी या मार्गावरील नागरिकांनी अनुभवला. या अंगावर शहारे आणणाºया घटनेतील भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (३९, रा. वडगाव, ता.आष्टी, जि.बीड) या मद्यपी चालकाला पोलिसांनी अटक करुन कंटेनर ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजता घडली.भाऊसाहेब खांडवे हा शनिवारी मुंबई येथून कंटेनर (क्र.एम.एच.२३ ए.यु.४४३३) घेऊन मलकापूर येथे रसायन पोहचविण्यासाठी गेला होता. रात्री मलकापूर येथे रसायन खाली केल्यानंतर रविवारी दुपारी बारा वाजता मलकापूर, बोदवड, जामनेर व जळगावमार्गे पुन्हा मुंबईकडे जाण्यासाठी निघाला. मार्गात त्याने मद्य प्राशन केले. त्याची नशा इतकी झाली की, त्याला कंटेनर चालविण्याचे भान राहिले नाही.गाडेगावजवळ एकाला दिली धडकनेरीपासून जळगावकडे सुसाट वेगाने येत असताना काही अंतरावर गाडेगावजवळ एकाला त्याने जोरदार धडक दिली. त्यानंतर पुढे रस्त्यावर चारचाकी व दुचाकींना उडविले. सुदैवाने या दुचाकीजवळ कोणी नव्हते. रस्त्याच्या कडेला वाहने पार्कींग केलेली होती. मद्यधुंद अवस्थेत चालक खांडवे हा भरधाव वेगाने कंटेनर चालवितच राहिला. नेरी येथील संबंधित काही वाहनचालक मागावर असल्याने त्या भीतीने कंटेनर चालकाने कंटेनर भरधाव वेगाने पळविला.जळगाव शहरात पोहोचल्यावरही हा कंटेनर चालक न थांबता अजिंठा चौकातून त्याने थेट शहरात प्रवेश केला. यात त्याने पुन्हा दोघांना कट मारला. त्यात दोघं किरकोळ जखमी झाले. हा कंटेनर रेल्वे स्टेशनच्या परिसरात पोलीस चौकीवर धडकला आणि तिथे थांबला. त्याच्या मागावर असलेल्या नागरिकांनी त्याला कंटेनरमधून उतरवित चोप दिला.