एलसीबीची कामगिरी : चार लाखांची रोकड हस्तगत
जळगाव : तालुक्यातील वावदडा रस्त्यावर चालकाला मारहाण करून ७ लाख ९० हजार रुपयांच्या रोकडसह कार असा एकूण १२ लाख ५० हजारांचा ऐवज लुटून नेणाऱ्या दीपक साहेबराव चव्हाण ऊर्फ डासमाऱ्या आप्पा (रा. सामनेर, ता. पाचोरा, हल्ली मुक्काम गिरड, ता. भडगाव) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून ४० हजारांची रोकड व कार हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात तुकाराम दिनकर पाटील उर्फ सोनू उर्फ मोघ्या रा. सामनेर ता. पाचोरा, हल्ली मुक्काम बरखळा पठाणी, भोपाळ, मध्यप्रदेश यासही निष्पन्न करण्यात आले असून त्याच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे.
एरंडोल येथे साखरेचे व्यापारी मनोज गोकूळदास मानुधने हे राहतात. त्यांचे दुकान असून त्यांनी विक्री केलेल्या साखरेच्या मालाचे पैसे जमा करण्यासाठी नाना पाटील हे जात असतात. याप्रकारे ७ मार्च रोजी नाना पाटील यांना शेंदुर्णी, सोयगाव, गोडेगाव, उडनगाव व सिल्लोड येथे साखर विक्री केलेल्या व्यापाऱ्यांकडून जमा झालेली ७ लाख ९० हजाराची रोकड घेऊन त्यांची कार क्र. एम.एच. ०२ ई आर ५३८२ ने एरंडोलकडे परतत होते. यादरम्यान जळगाव तालुक्यातील वावदडा गावापासून २ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या हॉटेल वासूमित्राजवळ सव्वा वाजेच्या सुमारास संशयितांनी नाना पाटील यांच्या कारसमोर कार आडवी उभी केली होती. तसेच त्यांना कारमधून उतरवून मारहाण करत कारच्या डिक्कीत ठेवलेली ७ लाख ९० हजारांच्या रोकडसह नाना पाटील यांची कार घेऊन संशयित पसार झाले होेते. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी सकाळी नाना पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या दरोड्याचा तपास करून संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ परिसरासह या मार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना या दरोड्याच्या गुन्ह्यात भडगाव तालुक्यातील गिरड येथील दीपक चव्हाण याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयितांच्या शोधार्थ त्यांनी सहायक फौजदार रा. का. पाटील, अनिल इंगळे, विजयसिंग पाटील, विलास पाटील, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, रमेश जाधव, मुरलीधर बारी, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांचे पथक नियुक्त करून रवाना करण्यात आले होते.