चाळीसगाव- मागील काही दिवसांपासून राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले बसचालक आबा नावरकर (३६, रा. चाळीसगाव) यांना गुरुवारी दुपारी हदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या चार दिवसांपासून एस.टी.चे कर्मचारी संपात उतरले आहेत. बस स्थानकाच्या परिसरात एका मंडपात हे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बसेसचा चक्का जाम झाला आहे. आबा नावरकर हे चालक आहेत. चार दिवसांपासून ते घरीही गेले नाहीत. गुरुवारी दुपारी त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. सव्वाचार वाजता त्यांना हदविकाराचा झटका येऊन ते खाली कोसळले. यानंतर इतर सहकाऱ्यांना त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.दरम्यान, चालक आबा नावरकर यांना दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉ. मंगेश वाडेकर यांनी दिली आहे.