आर्थिक कोंडी : उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ
जळगाव : कोरोनामुळे गेल्या महिन्याभरापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हे उद्योग-व्यवसाय करणारे व यावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे उत्पन्न घटले असताना, दुसरीकडे खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या नागरिकांना स्वतःच्या वाहनात साधी हवा भरण्यासाठी आर्थिक चणचण भासत असल्याचे दिसून आले.
गेल्या वर्षाप्रमाणे शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. सकाळी सात ते सकाळी अकरापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांनाच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. तसेच हातगाडीवर विविध जनरल-कटलरी वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही व्यवसायाची बंदी घालण्यात आल्यामुळे या व्यावसायिकांचे अधिकच हाल होत आहेत. व्यवसाय बंद असल्यामुळे, संसाराचा गाडा ओढणे अवघड झाले असतांना, त्यात दुचाकीत बिघाड झाला किंवा तिची हवा निघाली तर हवा टाकण्यासाठीही खिशात पुरेसे पैसे नसल्याचे समोर येत आहे
तसेच दुसरीकडे शहरातील गॅरेजही बंद असल्याने वाहनधारकांना गॅरेज दुचाकी दुरुस्तीसाठी मोठी फिरफिर करावी लागत आहे. तर गॅरेजही बंद असल्याने गॅरेज मालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.
इन्फो :
वाहने सुरू,पण गॅरेज बंद
प्रत्येक नागरिकाकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असून, कामानिमित्त त्यांना या वाहनांचा वापर करावाच लागतो. हे वाहन घेऊन घराबाहेर पडावेच लागते. सध्या संचारबंदी वाहने सुरू असली तरी, शहरातील गॅरेज मात्र बंद असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅरेज बंद असल्याने वाहनाची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------
इन्फो :
वाहन चालकांसमोर अडचणींचा डोंगर
शहरातील गॅरेज बंद असल्याने वाहनधारकांची दुचाकी व चार चाकीची दुरुस्ती करणे रखडले आहे. विशेष म्हणजे वाहनात बिघाड झाल्यामुळे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. गॅरेज बंदमुळे वाहनांचे किरकोळ कामही करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे मोठ्या वाहनांपेक्षा छोट्या वाहन धारकांचे अधिकच हाल होत आहेत.
--------
इन्फो :
गॅरेजवाल्यांचेही पोट-पाणी बंद
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत, शासनाने गॅरेजही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माझे गॅरेज सध्या बंद आहे. गॅरेज बंद असल्याने माझ्यासह गॅरेजवर काम करणाऱ्या कारागिरांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-मुन्ना गायकवाड, गॅरेज मालक
शासनाच्या सूचनांचे पालन करून गॅरेज बंद ठेवले आहे. महिनाभरापासून गॅरेज बंद असल्याने रोजंदारी बुडत आहे. यामुळे घर-संसार चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने आम्हालाही आर्थिक मदत करावी.
-नितीन पवार, गॅरेज मालक
इन्फो :
तर वाहने पार्किंग मध्येच
माझ्या गाडीचे टायर खराब झाले आहे. पावसाळा लागण्यापूर्वी नवीन टायर टाकायचे होते. मात्र, गॅरेज बंद असल्यामुळे टायर टाकण्याचे काम रखडले आहे. तसेच टायर पूर्ण कामातून गेले असल्याने, माझी दुचाकी गॅरेज उघडेपर्यंत पार्किंगमध्ये लावून ठेवली आहे.
तुषार देशमुख, दुचाकी मालक
गॅरेज बंद असल्याने माझ्या चारचाकी गाडीच्या सर्व्हिसिंगचे काम रखडले आहे. रस्त्यात कुठेही गाडी धोका देईल या भीतीने गाडीने बाहेर गावचा प्रवास बंद केला आहे. गॅरेज सुरू होईपर्यंत गाडी पार्किंगमध्ये लावून ठेवली आहे.
रणधीर जाधव, कारमालक