जळगाव : ग्रामीण भागातील प्रवाशांना, विद्यार्थांना व इतर चाकर मान्यांना शहरात येण्यासाठी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील दूरवरच्या गावांमध्ये रात्री मुक्कामी बसेस पाठविल्या जातात. बसवरील चालक-वाहकांना संबंधित गावाने ग्रामपंचायतीत रात्री झोपण्याची व्यवस्था केली तर ठीक, अन्यथा बहुतांश चालक-वाहकांना रात्री बसमध्येच झोपावे लागत आहे. मात्र, रात्रभर या चालकांना प्रचंड डासांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे जळगाव आगारातून विविध ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या काही चालक-वाहकांनी सांगितले.
जळगाव आगारातून सध्या ग्रामीण व शहरी भाग मिळून ३० ते ३५ बसेस बाहरगावी रात्री मुक्कामाला असतात. प्रत्येक बसवर चालक व वाहक या प्रमाणे ६० ते ७० कर्मचारी रात्री विविध गावांमध्ये मुक्कामी असतात. यामध्ये मुंबई, पुणे, उधना, सुरत, सेल्वासा या लांब अंतरावरच्या बसेस मुक्कामासाठी सकाळी निघतात. तर ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सायंकाळी निघतात. सकाळी पुन्हा या बसेस प्रवाशांना घेऊन जळगाव आगारात येतात.
मात्र, या बसेसवर मुक्कामासाठी जाणाऱ्या चालक-वाहकांना रात्री मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामंडळातर्फे कुठेही झोपण्याची व्यवस्था नसल्यामुळे बसमध्येच झोपावे लागते. डास चावत असल्यामुळे कर्मचारी मच्छर दाणी घेउन जातात. तर काही कर्मचारी गावातील ग्रामपंचायतीच्या किंवा शाळेच्या ओट्यावर मच्छरदाणी लावून झोपतात. यामध्ये पावसाळ्यात तर खुप हाल होत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
इन्फो :
रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेस
४०
मुक्कामी थांबावे लागतात
असे वाहक
४०
चालक
४०
गावात सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे गैरसोय
- ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या काही चालक-वाहकांनी सांगितले की, अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालये नाहीत. तर ज्या गावांमध्ये आहे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. तर शौचालयांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे रात्री उघड्यावर जावे लागत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
- तर पुणे, मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या वाहकांनी सांगितले की, या मोठ्या शहरांमध्ये आगारातच रात्री मुक्कामाला बस थांबते. तेथील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र असलेल्या विश्रांती गृहात मुक्कामाला थांबत असतो. या ठिकाणी बऱ्यापैकी सुविधा असतात. त्यामुळे फारसी गैरसोय होत नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
कोरोनामुळे लवकर मदत मिळेना
- सध्या कोरोनामुळे बाहेरगावी मुक्कामी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मुक्कामी जातांना या कर्मचाऱ्यांकडे रात्रीची शिदोरी व पाणी सोबत असले तरी, रात्रीच्या वेळेला पिण्याच्या पाण्याची गरज पडली, तर नागरिक कोरोनाच्या भितीने लवकर पाणी देत नसल्याचेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक सहकार्याची भावना न ठेवता, मदतीपासून दुर पळत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, असे असले तरी आम्ही या गोष्टींचा विचार न करता, आमच्याकडे सर्व प्रकारची शिदोरी ठेवून, आमचे कर्तव्य चोखपणे पार पडत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बाहेरगावी मुक्कासाठी गेल्यावर काही ठिकाणी ग्रामपंचायतीकडून राहण्याची सुविधा केली जाते. त्यामुळे रात्री फारसा त्रास जाणवत नाही. जर कुठल्या गावामध्ये व्यवस्था नसली, तर बसमध्येच डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी लावून झोपून राहतो.
एक चालक,
इन्फो :
ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून झोपण्याची व्यवस्था केली असली, तर थोडाफार त्रास सहन करावा लागतोच. अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचायलही नसल्यामुळे उघड्यावरच जावे लागते. गावात रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यावर, बसच्या टपावरच झोपावे लागते. ड्युटी असल्यामुळे डासांमध्ये झोपण्याची सवयच झाली आहे.
एक वाहक
इन्फो :
दोन वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश गावांमध्ये तेथील ग्रामपंचायतींनी चालक-वाहकांची रात्री झोपण्याची चांगली व्यवस्था केलेली दिसून आली. त्यामुळे कुठेही रात्री मुक्कामी कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले नाही. पूर्वीच्या पेक्षा आता ग्रामीण भागात खुप चांगल्या सुविधा मिळत आहेत.
प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार