जळगाव : चुलत भावासोबत पोहायला गेलेल्या अजय मुरलीधर पाटील (२१ रा. देवरामनगर) या तरुणाचा सावखेडा, ता. जळगाव शिवारात तापीनदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने अजय सोमवारी सावखेडा येथे गेला होता. याठिकाणी दुपारी चुलत भाऊ अक्षय दत्तू पाटील याच्यासोबत शेताकडील नदीपात्रात पोहायला गेला. दोघे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अजय खोल पाण्यात बुडाला. हा प्रकार अक्षयच्या लक्षात आल्यावर त्याने आरडाओरड केली.या परिसरात असलेल्या पट्टीच्या पोहणाऱ्या मच्छीमारांनी नदीपात्रातून अजयचा मृतदेह बाहेर काढला. धाव घेत अजयला जिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.वडील शिक्षक तर भाऊ अभियंताअजय याचे वडील मुरलीधर प्रल्हाद पाटील हे धामणगाव येथील विद्यालयात शिक्षक आहेत. आई सरलाबाई गृहीणी असून मोठा भाऊ अमोल शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून नोकरीला आहे. अजय हा नूतन मराठा महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेत होता.
नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:29 PM