जळगाव - बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस् ! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला रुग्ण ठरल्या आहेत.जळगाव जिल्ह्यातील मुंगसे येथील महिला कोरोना बाधित आढळून आली होती. या महिला रुग्णाचा दुसरा व तिसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना आज टाळ्यांच्या गजरात घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून जाताना ही महिला भावनाविवश झालेली दिसून येत होती. शिवाय तीच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील, डॉ विजय गायकवाड यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील पहिला रुग्ण तीही महिला आज कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड 19 रुग्णालय परिसरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: परिचारिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गेले चौदा दिवस त्यांनी धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील दुसरा व पहिलीच महिला रुग्ण बरी होऊन घरी जाणार होती. डॉ. खैरे आणि त्यांच्या टीमने 14 दिवस या रुग्णांवर उत्तमरितीने उपचार केले. उपचारादरम्यान वृद्ध महिलेनेही डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिसादही दिल्यानेच हे घडले.आज या महिला रुग्णांस उत्साहात व टाळयांच्या गजरात निरोप देण्यात आला. यावेळी या महिलेस विचारले असता बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप, भाऊ शेतस् ! सगळयांचे चांगले होईल असा माझा आशिर्वाद असल्याचे उद्गार काढले आणि रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लागले. त्यानंतर त्यांना एका रुग्णवाहिकेतून मुंगसे, ता. अमळनेर येथे त्यांच्या घरी पाठविण्यात आले.
बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस् !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 6:53 PM