हनुमानवाडी : पाच जण जखमी, १५ जणांविरुद्ध गुन्हा
पाचोरा : खरकटे पाणी नकळत शेजाऱ्याच्या अंगावर पडल्याच्या कारणावरून हनुमानवाडी, ता. पाचोरा येथे सख्खे शेजारी पक्के वैरी झाले. शेजाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. पाच जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली होती.
या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच पोलीस यंत्रणा कामाला लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी गावी दि. ९ रोजी रात्रीच्या सुमारास एका महिलेकडून अंगणात जेवणाचे खरकटे पाणी फेकले. ते
शेजारच्या इसमाच्या अंगावर पडले. यावरुन भांडण झाले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास दोन्ही गटात समझोता घडविण्यासाठी मंदिरात बैठक बोलावण्यात आली. या बैठकीतच वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करीत लाठ्याकाठ्या घेत तुंबळ हाणामारी झाली. यात पाच जखमी झाले. त्यांना जळगाव येथील जिल्हा व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही गटातील जखमींचे जळगाव येथून जबाब घेऊन रात्री उशिरा परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. यात जिजाबाई रवींद्र पवार या महिलेच्या
फिर्यादीवरून भाईदास भालचंद्र पवार, सोनू पवार, भालचंद्र चतरु पवार, छाया पवार,अनिता भाईदास पवार, सुनीता भारत पवार या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला तर दुसऱ्या गटातील भालचंद्र चतरु राठोड याच्या फिर्यादीवरून पूरणदास मानसिंग पवार, विठ्ठल पवार, दुबेसिंग पवार,बबन पवार,जिजाबाई रवींद्र पवार, ज्योतिबाई पवार, रुखमाबाई पूरणदास पवार, रेणुकाबाई गोविंदा पवार, कविता विठ्ठल पवार अशा नऊ जणांविरुद्ध भादंवि ३२६,१४३,१४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस पाटील किसन राठोड यांनी सांगितले की, भांडण झाले तेव्हा तत्काळ पोलिसांना खबर दिली होती, पोलीस घटनास्थळी आले. जखमींना जळगाव येथे रवाना केल्याने गुन्हा उशिरा दाखल झाला.