वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : एखाद्या प्रकल्पाला अडचणी येणार तर त्या सर्वच ठिकाणाहून येणार, याचे उदाहरण म्हणजे मधुकर सहकारी साखर कारखाना आहे. गेल्या वर्षीचा हंगाम बंद राहिला. पर्यायाने डिस्टीलरी बंद, त्यामुळे अल्कोहोल निर्मिती नाही; अन्यथा या कोरोनाच्या महामारीत सॅनिटायझर निर्मिती करून ‘मधुकर’ला थोडीफार का होईना आर्थिक संजीवनी मिळाली असती. मात्र ही संधी हुकली आहे.गेल्या चार महिन्यात सॅनिनटायझर विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग आजारामुळे सॅनिटायझर आता प्रत्येकाची गरज झाली आहे. त्यामुळे सॅनिटायझर निर्मितीसाठी राज्यात अनेक साखर कारखान्यांनी परवानगी मिळवत याची निर्मिती केली व त्यातून आर्थिक फायदाही झाला. तशी संधी ‘मधुकर’लाही होती. मात्र सन २०१९-२० चा हंगाम बंद राहिला. त्याला कारणही अनेक होती. हंगाम बंद राहिला. पर्यायाने दररोज ३० हजार लीटर अल्कोहोलची निर्मिती करणारी डिस्टीलरी बंद ठेवावी लागली. कामगारांचे पगार, ऊस उत्पादकांचे वेतन या आर्थिक अडचणीमुळे ‘मधुकर’चे कामगारही वाऱ्यावर राहिले.हंगाम सुरू राहिला असता तर डिस्टीलरीही सुरू राहिली असती. पर्यायाने अल्कोहोल निर्मिती होऊन त्यातून सॅनिटायझर निर्मिती होऊ शकली असती. मात्र ही संधी हुकली. अन्यथा सॅनिटायझर निर्मितीमधून कारखान्याला आर्थिक संजीवनी मिळाली असती.डिस्टिलरीमध्ये अतिशय किरकोळ बदल करून सॅनिटायझरची निर्मिती सहज होऊ शकते, अशी भावना चेअरमन शरद महाजन यांनी व्यक्त करत कारखाना सुरू राहिला असता तर सॅनिटायझरची निर्मिती निश्चित झाली असती, असे सांगितले.
‘मधुकर’चा हंगाम बंदमुळे सॅनिटायझर निर्मितीची संधी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 8:05 PM