आषाढी एकादशी : कोरोनामुळे मंदिरे बंद असल्यामुळे भाविक दर्शनालाही मुकणार
जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनामुळे पिंप्राळ्याचा रथोत्सव साध्या पद्धतीने होणार आहे. या ठिकाणी फक्त रथाची पाच पावले ओढून रथोत्सवाची सांगता होणार आहे. मात्र, कोरोनामुळे शहरातील मंदिर बंद असल्यामुळे, भाविकांना आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरही दर्शनाला मुकावे लागणार आहे.
शासनाने यंदाही कोरोनाच्या पार्शभूमीवर यंदाही मार्च महिन्यापासून मंदिरे बंद ठेवली असल्यामुळे, यंदाही जळगावकरांचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पिंप्राळ्याचा रथोत्सव साध्या पद्धतीने होणार आहे. पिंप्राळ्यातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे शासनाच्या सूचनेनुसार रथोत्सवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे, तसेच दिवसभरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे. दर आषाढी एकादशीला येथील रथोत्सवाला १४६ वर्षांची परंपरा असल्याने, ही परंपरा खंडित होऊ नये, म्हणून फक्त पाच पावले रथ यावेळी ओढण्यात येणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही साध्या पद्धतीने रथोत्सव असला, तरी मंदिर समितीतर्फे सोमवारी या रथोत्सवाला पाण्याने स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर, निर्जंतुकीकरण करण्यात आले. मंगळवारच्या रथोत्सवासाठी सायंकाळी रथाला सजविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, दुसरीकडे शहरातील जुने जळगाव व मेहरूणमधील विठ्ठल मंदिरातही कोरोनामुळे साध्या पद्धतीने पूजेचा कार्यक्रम होणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार फक्त पाच भाविकांच्या उपस्थितीत पूजेचा कार्यक्रम होणार असून, पूजेनंतर शासनाच्या सूचनेनुसार मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले.